Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

स्तन कर्करोग रुग्णांनी स्विकारला ढोल ताशा वादनाचा मंत्र

पुणे : स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर केलेल्या वैद्यकीय शस्त्रक्रियेचा त्रास दूर करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ढोल-ताशा वादनाचा मंत्र आम्ही स्विकारला आणि आमच्यामध्ये अमूलाग्र बदल घडला. दैनंदिन आयुष्यात आत्मविश्वास आणि उत्साह देखील निर्माण झाल्याचे सांगत स्तन कर्करोग शस्त्रक्रियेनंतर वेदना सहन करणा-या महिलांनी चक्क ढोल-ताशा वादन केले.

निमित्त होते, आस्था ब्रेस्ट सपोर्ट ग्रुप पुणे व ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र तर्फे बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित एका अभूतपूर्व वैद्यकीय सोहळ्याचे. यावेळी उपस्थितांनी स्तन कर्करोग रुग्णांचे ढोल ताशा वादन प्रत्यक्षपणे अनुभवित त्याचे झालेले फायदे देखील जाणून घेतले. या उपक्रमाकरिता ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, ज्येष्ठ कर्करोगतज्ञ डॉ.शेखर कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे.

पराग ठाकूर म्हणाले, स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांच्या हालचालींवर मर्यादा येतात. मात्र, ढोल-ताशा वादनाने हा त्रास कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर महासंघाकडे डॉ.शेखर कुलकर्णी यांनी अशा महिलांना आपण प्रशिक्षण द्यावे, अशी विनंती केली. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ व मंडळाचे कार्याध्यक्ष ओंकार कलडोणकर यांच्यावर ही जबाबदारी महासंघातर्फे सोपविण्यात आली आणि त्यांनी ती उत्तमरितीने पार पाडली आहे.

डॉ.शेखर कुलकर्णी म्हणाले, वयवर्षे ४० ते ७० मधील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यांच्यात अमूलाग्र बदल झाला आहे. हाताच्या वेदना कमी होणे, ताजेतवाने वाटणे, रक्तदाब नियंत्रणात येणे, कोणतेही काम करण्यास उत्साह, नैराश्यातून बाहेर पडण्यास बदल असे अनेक चांगले परिणाम वादनाने त्या रुग्णांमध्ये झाले आहेत. त्यामुळे त्यांचे वादन पाहण्यासोबतच अनुभव ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांना मिळाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading