नाटक म्हणजे भावभावनांचा कल्लोळ – डॉ. राम साठ्ये
पुणे : नाटकातील प्रत्येक पात्रांमध्ये सत्व, रज, तम हे तीन गुण असतात. नाटक हे समतल कधीच असू शकत नाही, नाटक म्हणजे भावभावनांचा कल्लोळ आहे. सत्व, रज आणि तम चा अविष्कार म्हणजे नाटकातली पात्रे. भिन्न अभिरुची असणाऱ्या लोकांचे नाटक हे एकाच वेळी मनोरंजन करते. समाजाला एकत्रित ठेवून त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन नाटकाच्या माध्यमातून केले जाते, असे मत संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते डॉ. राम साठ्ये यांनी व्यक्त केले.
पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने नाट्य कलावंतांसाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राम साठ्ये यांच्या अध्यक्षतेखाली विविध पुरस्कार देण्यात आले. तसेच कै. कृष्णराव गोखले पुरस्कार डॉ. राम साठ्ये यांना पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते रवींद्र खरे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय बर्वे, कार्याध्यक्ष श्रीकांत देव, कोषाध्यक्ष शरद घाणेकर, कार्यवाह सुधीर इनामदार, सहकार्यवाह विद्युत पावगी यावेळी उपस्थित होते.
यावेळी अनुष्का आपटे यांना कै. नरहरबुवा पाटणकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संजय लोळगे (अहमदनगर), सुधीर फडतरे (पुणे), निधी घारे (पुणे) हे कै. हरी गणेश फडके पारितोषिकाचे मानकरी ठरले.
डॉ.राम साठ्ये म्हणाले, अविट गोडीची गाणी ही संगीत नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. संगीत नाटके दोनशे वर्षांपासून टिकून आहेत आणि पुढील दोन हजार वर्षे देखील टिकून राहतील.
रवींद्र खरे म्हणाले, नाटक चालू ठेवणे म्हणजे परंपरा टिकून ठेवणे. परंपरा सुरू ठेवताना ती सक्षम आणि सुदृढ असायला हवी आणि त्यात सतत नावीन्य आणायला हवे, असेही त्यांनी सांगितले. सुधीर इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत देव यांनी प्रास्ताविक केले. शरद घाणेकर यांनी आभार मानले.
