मात्र अद्याप पुण्याचा पालकमंत्री ठरला नाही – चंद्रकांत पाटील
पुणे: पुण्याचे पालकमंत्री कोण होणार.याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तूळात उत्सुकता आहे. कारण पुण्यातील राजकीय केंद्रबिंदू हाच पालकमंत्री राहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुण्याचे पालकमंत्री होतील,अशी जोरदार चर्चा होत आहे. मात्र अद्याप पुण्याचा पालकमंत्री ठरला नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
चंद्रकांत पाटील हे दहीहंडी उत्सवाबद्दल बोलतांना म्हणाले, की, कोरोनामुळे २ वर्ष कुठेले ही सण आपल्याला साजरा करता आला नाही. सगळीकडे बंधन होती. मात्र कोरोना संपला आहे असं म्हणता येणार नाही. पण त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे सगळे सण आपण उत्साहात साजरे करणे सुरू केले आहे. या सरकार ने लोकांच्या भावना लक्षात घेऊन सुट्टी घोषित केली आहे. याबरोबरच १० लाखांचा विमा आपण गोविंदांना दिला आहे. दहीहंडी हा खेळांच्या यादीत सामील झाला आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण दिले जाईल, ही घोषणा आणि राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे, असा आरोप एमपीएससी समन्वय समितीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,आरक्षणाबाबात काही गैरसमज झाला आहे. खेळाडूंना वेगळं आरक्षण दिले आहे असे अनेकांना वाटत आहे. पण तसे नसून खेळाच्या कोट्या मध्ये हे आरक्षण दिल्याचे पाटलांनी स्पष्ट केले.
