अनिकेत शर्मा, आसावरी निकम मॅरेथॉनमध्ये प्रथम
पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्हीआयटीच्या पद्मभूषण डॉ. वसंत दादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांच्या गटातून अनिकेत शर्मा तर मुलींच्या गटातून आसावरी निकम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरविंद नातू, संस्थेचे सचिव जितेंद्र पितळीया, महाविद्यालयाचे संचालक प्रा.प्रसन्न देसाई, शेखर गरुड उपस्थित होते. मुलांसाठी ८ किलोमीटर आणि मुलींसाठी ६ किलोमीटर अंतरात ही स्पर्धा झाली. अरविंद नातू यांच्या हस्ते पारितोषिक देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.
भुगाव ते पिरंगुट मधील महाविद्यालयाचे कॅम्पस यादरम्यान ही मॅरेथॉन पार पडली. मॅरेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डाॅ.अरविंद नातू म्हणाले, तुम्हाला तुमच्या वारशाचा अभिमान असला पाहिजे, पण तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवले पाहिजेत. जे खरोखरच अस्पष्ट आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग प्रश्न विचारा- का?, कसे?, का नाही? यामधून नवीन संशोधनाचा उद्य होईल. यावेळी बोलताना त्यांनी पीव्हीपी काॅलेज आॅफ आर्किटेक्चरच्या उपक्रमांचे, नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीचे कौतुक केले.
