श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
शिवरायांनी मावळे घडवले तसे समाजातील प्रत्येक व्यक्तीने घडले पाहिजे
पुणे : भारत देश हा कणखर व्यक्तींचा देश आहे, म्हणून या देशातील प्रत्येक तरुण हा देखील कणखर असला पाहिजे. जर देशात अचानक युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर प्रत्येकाला लढता आले पाहिजे. छत्रपतींच्या या देशात त्यांनी जसे मावळ्यांना घडविले तसे प्रशिक्षण आज प्रत्येक व्यक्तीला दिले पाहिजे. तर भारत देश हा जगातील सर्वश्रेष्ठ देश असेल, असे मत पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, मानद सहसचिव विकास गोगावले, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, पद्माकर पवार, जगदीश जेधे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आप्पासाहेब जेधे महाविद्यालय, श्री शिवाजी मराठा हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, सीताराम विद्यालयचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
माधव जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांनी मनाची ताकद वाढविली पाहिजे. तर तुम्ही निश्चित केलेले ध्येय तुम्हाला साध्य करता येईल. त्याचबरोबर पर्यावरणाचा विचार देखील करून पुढील पिढीसाठी स्वच्छ वातावरण निर्माण होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले. महेंद्र चंद यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या डॉ. दिपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले, अरविंद मोडक यांनी आभार मानले.
