पीएमपीच्या ६ दिव्यांग सेवकांना तीन चाकी स्कूटरचे वाटप
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील ६ दिव्यांग सेवकांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनाचे
औचित्य साधून खास दिव्यांगांसाठी असलेल्या तीन चाकी स्कूटरचे वाटप करण्यात आले. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार व महाव्यवस्थापक सुबोध मेडसीकर यांच्या हस्ते सुझुकी अॅक्सेस या तीन चाकी स्कूटर (रेट्रो फिटमेंट कीट अॅटॅचसह टू व्हीलर) च्या चाव्या दिव्यांग सेवकांना प्रदान करण्यात आल्या. स्वारगेट मुख्यालयाच्या मध्यवर्ती यंत्रशाळेत सदरचा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र शासन निर्णय परिपत्रक दिनांक १४/०२/२०१२ अन्वये परिवहन महामंडळाकडील पात्र ६ दिव्यांग सेवकांना तीन चाकी स्कूटरचे वाटप करण्यात आले. परिवहन महामंडळाकडून मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे दिव्यांग सेवक भारावून गेले होते. याप्रसंगी पीएमपीएमएलचे सर्व विभाग प्रमुख, सर्व आगार व्यवस्थापक, सर्व आगार अभियंता यांच्यासह कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
ज्या ६ दिव्यांग सेवकांना तीन चाकी स्कूटरचे वाटप करण्यात आले त्यांची नावे पुढील प्रमाणे : विठ्ठल तुकाराम झेंडे, मोहन अर्जुन लाखे, बाळू बबनराव धर्माधिकारी, दिलीप शंका खंडाळे, शैजाद हिमायत काजी, सुरेखा मल्लिनाथ चनगोंडा.