सीएनजीच्या दरात आज मध्य रात्रीपासून 4 रुपयांची कपात
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सतत दरवाढीचे चटके सहन करीत असलेल्या सीएनजीच्या वाहन चालकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजीचा दर चार रुपयांनी कमी उद्यापासून होणार आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या सीएनजी वितरित करणाऱ्या कंपनीकडून ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात सीएनजी ८७ रुपये प्रति किलोने मिळणार आहे. पूर्वी ही किंमत ९१ रुपये प्रति किलो होती. या पूर्वी सीएनजीवरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केल्याने दर प्रतिकिलो ६.३० रुपयांनी कमी झाले आहेत.
त्यानंतर मात्र सातत्याने दरवाढ होत होती. स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्याने सीएनजीच्या दरात गेल्या महिन्यात सहा रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात आता सीएनजीचा दर प्रतिकिलो ८५ वरून ९१ रुपये झाला होता.