तिरांग्यासोबत एक लाख फोटोंचा टप्पा पार.!
विश्वविक्रमाकडे वाटचाल: आज रात्रीपर्यंत फोटो अपलोड करत सहभागी व्हा
पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ आणि ‘स्वराज्य महोत्सव’ या अभियानांतर्गत विद्यापीठाने राष्ट्रध्वजासोबतच्या फोटो अल्बमच्या विश्वविक्रमी वाटचाल सुरू झाली आहे. आतापर्यंत एक लाख फोटो अपलोड करण्यात आले असून उद्या दिवसभरात जास्तीत जास्त राष्ट्रध्वजासोबतचे फोटो अपलोड करून मोठा विश्वविक्रम प्रस्थापित करावा असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘ हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दीड लाख फोटो
राष्ट्रध्वजासोबत काढत जागतिक गिनीज बुक मध्ये विश्वविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे. याला पुणे, अहमदनगर आणि नाशिक यासोबतच सर्व स्तरातून आतापर्यंत उदंड प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत विद्यापीठाने राष्ट्रध्वजासोबतचे एक लाख सेल्फी अपलोडदेखील केले आहेत.
हे फोटो अपलोड करण्यासाठी केवळ हातात तिरंगा घेत आपला फोटो काढत विद्यापीठाच्या ॲपवर अपलोड करायचा आहे. यासाठी वयाची कोणतीही अट नाही, त्यामुळेच आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व युवा संकल्प अभियान समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी केले आहे.
आतापर्यंत एक लाखाचा टप्पा पार केला असून आज दिवसभर विद्यापीठाची फोटो अपलोड करण्याची लिंक सुरू असणार आहे. विद्यार्थी, नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांनीच यात सहभागी होत आजच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त फोटो अपलोड करावेत व या अमृतमहोत्सवी क्षणाचे कायमस्वरूपी साक्षीदार व्हावे.
- राजेश पांडे, अध्यक्ष – आयोजन समिती स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘हर घर तिरंगा’ व युवा संकल्प अभियान
