ईशान घोष यांच्या तबला वादनाने तरुणाई मंत्रमुग्ध
पुणे : तरुण तबला वादक व पंडित नयन घोष यांचे सुपुत्र ईशान घोष यांच्या तबला वादनाला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निमित्त होते एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्टस् तर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दीक्षारंभ या कार्यक्रमाचे. कार्यक्रमात ईशान घोष यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समोर आपली कला सदर केली. यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, केंद्रीय जीएसटी आणि कस्टम विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र दास, सुप्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे, डॉ संजय उपाध्ये आणि स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स’च्या प्रमुख डॉ. प्रीती जोशी आदी उपस्थित होते. पारंपारिक रचानांना छोट्या छोट्या प्रसंगाची जोड देत, सादर केलेल्या ईशान यांच्या सोलो तबला वादनाला हार्मोनीयमची साथ अभिषेक शिनकर यांनी केली.
भारत हा कला आणि संस्कृतीने संपन्न असलेला देश आहे, जे आपल्याला एक वेगळी ओळख देतात. तरुणांनी आपल्या देशाची कला आणि संस्कृती जाणून घेतली पाहिजे, त्याला पाश्चात्य संस्कृतीतील काही चांगल्या गोष्टींची जोड देत, ‘सुपरव्हायब्रंट इंडिया’ घडविण्याचे स्वप्न तरुणांनी बाळगावे, असे आवाहन यावेळी ईशान घोष यांनी विद्यार्थ्यांना केले. ते पुढे म्हणाले की आज तरुणाई अनेक गोष्टी जाणून घेण्याची, ते शिकण्याची संधी उपलब्ध होता आहे. त्याचा वापर करत, इतर संस्कृतीमधील काही चांगल्या गोष्टी आत्मसात काराव्या. आपल्या संस्कृती, कलेला त्याची जोड देत त्यातून नाविन्यपूर्ण कलाकृती घडविण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा.’’
विभावरी देशपांडे म्हणाल्या, “ कोविड’ने आपल्या सर्वांना पर्यायी कौशल्य आत्मसात करण्याचे महत्व शिकवले. आपल्या सर्वांमध्ये एकापेक्षा अधिक कौशल्ये असतात. मात्र अनेकदा आपण त्या कौशल्यांचा वापर करण्यास धजावत नाही. मात्र तसे न करता, आपण विशेषतः विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचा, कौशल्यांचा शोध घ्यावा. आपल्याला आवडतील त्या गोष्टी शिकाव्यात. स्वत:ला ठराविक गोष्टी पुरते मर्यादित ठेवू नये.’’
रवींद्र दास म्हणाले, “ लिबरल आर्ट या शाखेतून विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक शाखेतील त्यांच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय उपयुक्त बाब आहे. मात्र विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, ती म्हणजे शिक्षण घेताना अथवा करिअर’च्या वाटेवर तुम्हाला मिळालेले यश किंवा अपयश हे तुमच्या जीवनाची व्याख्या निश्चित करत नाही. त्यामुळे यशाने कोणी हुरळून किंवा अपयशाने खचून जावू नये.’’
डॉ. आर एम चिटणीस म्हणाले, “इंटेलिजंट कोशंट (ईक्यू), इमोशनल कोशंट(इक्यू) आणि स्पिरीच्युअल कोशंट (एसक्यू) ही यशाची त्रिसूत्री आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ येथे आम्ही ही त्रिसूत्री अंगीकारण्याचा आणि विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासावर भर देत, ते एक सज्जन व्यक्तीमत्व म्हणून या विद्यापीठातून बाहेर पडावे हा आमचा हेतु असून, त्याअनुषंगाने आमचे कार्य सुरु असते.’’
डॉ. प्रीती जोशी म्हणाल्या , “ केवळ तीन वर्षांच्या काळात एमआयटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट’ने यशस्वी वाटचाल करत देशातील एक उत्तम महाविद्यालय म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. विद्यार्थी वर्गात काय शिकतात यापेक्षा ते वर्गाबाहेर काय शिकतात हे महत्वाचे असते,यावर आमचा अधिक विश्वास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देत, त्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक, अनुभवाधारित शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांमधील नाविन्यतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यासाठी प्रत्येक शिक्षकाला एक लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नावीन्यतेला चालना देण्यास मदत होते.’’
कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्यामध्ये विराज जोशी, अनुष्का पारीख, लोकाक्षी प्रभुदेसाई, मयुरी गोडबोले आणि मनस्विनी आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक मधुरा लोंढे आणि अभिजित चोरे यांनी केले.
