Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी कार्यरत रहा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचविण्यासाठी महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सदैव प्रयत्नशील रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, महसूल विभाग राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणारा विभाग आहे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने अहोरात्र काम करुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेमडेसिव्हीर औषधाचा पुरवठा, अन्नधान्य वितरण, ऑक्सिजनचा पुरवठा, खाटांची व्यवस्था आदी सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या. महसूल वसुलीमध्ये जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील विविध पायाभूत प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाहीला गती देऊन नियोजित प्रकल्प वेळेत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांप्रती सकारात्मक वर्तन आणि संवेदनशील राहून काम करावे. कामाशी निगडित कौशल्ये संपादन करावेत, याचा आपल्या कामावर निश्चित सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, नागरिक महसूल विभागाकडे शासन या भावनेने बघतात. नागरिकांचे वाद, तंटे मिटविण्यसाठी महसूल विभाग काम करीत असतो. त्यामुळे महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे. शासनाने ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेल्या सेवांमध्ये सातत्य ठेवावे, असेही ते म्हणाले.

निवासी उपजिल्हाधिकारी खराडे म्हणाले, अतिवृष्टी, पूरस्थिती अशा विविध आपत्कालिन परिस्थतीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करतात. सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचे कार्य करतात.

यावेळी उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी देशमुख, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रविण साळुंके, राजेंद्र कचरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, तहसिलदार श्रीकांत पाटील, सचिन पाटील, राधिका हावळ-बारटक्के, नायब तहसिलदार संजय खडतरे, संजय शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह उत्कृष्ट मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, महसूल सहायक, वाहनचालक, शिपाई, पोलीस पाटील आणि कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading