fbpx

शब्द नसले तरी व्यंगचित्राला असते अस्तित्व : शि. द. फडणीस

पुणे : भाषा, प्रांत, देश, संस्कार अशा सगळ्या सीमा ओलांडून व्यंगचित्र जाऊ शकते. शब्द नसले तरी व्यंगचित्राला अस्तित्व असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी केले. नियमित योगासने, कशाच्याही पाठीमागे न धावता चालत चालत सर्व गोष्टी मिळविता येतात तसेच जीवनातील साफल्य काय हे ठरविता आले पाहिजे हीच माझ्या समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते असे म्हणतात, पण माझी पत्नी माझ्या मागे होती आणि पुढेही होती असे सांगून आपल्या यशात कुटुंबियाचाही मोलाचा वाटा आहे, असे त्यांनी मोठ्या अभिमानाने नमूद केले.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी आज (29 जुलै) 98व्या वर्षात पदार्पण केले असून त्यांच्या शब्दविरहित हास्यचित्रांच्या कारकिर्दीलाही 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. व्यंगचित्रांच्या दुनियेतील त्यांच्या या प्रवासाला सलाम करण्यासाठी ‘कार्टूनिस्टस्‌ कम्बाइन’ या मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आणि गंगोत्री होमस्‌ ॲन्ड हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालनात ‘सलाम हसऱ्या रेषांना’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचे हस्ते झाले. उद्घाटन समारंभानंतर शि. द. फडणीस यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होत. दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी फडणीस बोलत होते.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील 70 पेक्षा जास्त मराठी व्यंगचित्रकारांची शब्दविरहित हास्यचित्रे या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आली आहेत. प्रदर्शन दि. 31 जुलैपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुले आहे. ‘कार्टूनिस्टस्‌ कम्बाइन’चे माजी अध्यक्ष चारुहास पंडित, विद्यमान अध्यक्ष संजय मिस्त्री, गंगोत्री होमस्‌ ॲन्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर, गणेश जाधव, राजेंद्र आवटे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार, शि. द. फडणीस यांच्या कन्या रूपा देवधर, लीना गोगटे आदी उपस्थित होते.
कोल्हापूरची पार्श्वभूमी आणि कलेचा प्रवास उलगडताना फडणीस म्हणाले, पेंटर आणि पहिलवान असे दोन्ही होण्याचा प्रयत्न केला पण काय झालो हे तुमच्यासमोर आहे. सरळ रेषा काढण्याऐवजी वाकड्यातिकड्या रेषा काढलेल्या पाहून माझ्या गुरुंनाही माझ्याविषयी चिंता वाटली होती अशी आठवण त्यांनी सांगितली. शब्द न वापरता संवाद झाला पाहिजे ही पहिल्यापासूनची धारणा होती, कल्पना प्रत्यक्षात उतरत गेल्या असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. 1965 मध्ये भरविलेल्या पहिल्या प्रदर्शनाची आठवण सांगताना ते म्हणाले, चित्र कधी संपत नाहीत आणि शिळेही होत नाही. व्यंगचित्रकलेच्या माध्यमातील नवी तंत्रज्ञान हे ‘मॅजिक ब्रश’ आहेत, त्यांच्या मैत्री करा असा सल्लाही त्यांनी नवोदितांना दिला.
सुरुवातीस फडणीस यांना वाढदिवसानिमित्त कुटुंबियांनी ओवाळले. विविध संस्था, हितचिंतकांनी फडणीस यांना शुभेच्छा दिल्या. शि. द. फडणीस यांचा सत्कार मकरंद केळकर, गणेश जाधव आणि राजेंद्र आवटे यांनी केला. प्रास्ताविक संजय मिस्त्री यांनी केले. उपक्रमातील सहभागाबाबत मकरंद केळकर यांनी सविस्तर माहिती दिली. प्रदर्शनाविषयीची संकल्पना चारुहास पंडित यांनी विषद केली. दिलीप प्रभावळकर यांचा सत्कार गणेश जाधव यांनी केला. सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: