Wednesday, June 10, 2026
Latest NewsNATIONALPUNE

उच्च पदावर महिलांच्या निवडीबाबत असलेला रुढीवाद मोडण्याचा प्रयत्न – जेनिफर जोन्स

रोटरी इंटरनॅशनल’च्या पहिल्या महिला अध्यक्षपदी निवड झाल्यांनतर जोन्स प्रथमच पुणे भेटीवर

पुणे : “ रोटरी इंटरनॅशनल’च्या पहिल्या अध्यक्षपदी निवड होणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची, अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे संघटनेत विविध दृष्टीकोन असणाऱ्या सदस्यांसाठी संवादाचे माध्यम खुले झाले आहे. उच्च पदावर महिलांच्या निवडीबाबत  असलेला रुढीवाद मोडीत काढत, तरुण पिढीसाठी एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे मत रोटरी इंटरनॅशनल’च्या पहिल्या महिला अध्यक्ष जेनिफर जोन्स यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

रोटरी इंटरनॅशनल’च्या ११७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिलेची अध्यक्षपदी निवड झाली असून, कॅनडा येथील ओंटारियोमधील रोटरी क्लब ऑफ विंडसर रोझलँड’च्या सदस्य असलेल्या  जोन्स यांना हा बहुमान मिळाला आहे. सध्या भारत दौर्यावर असलेल्या जोन्स यांनी शुक्रवारी पुण्यात भारतातील  रोटरी क्लब’चे पदाधिकारी आणि सदस्यांची भेट घेतली. या प्रसंगी सेनापती बापट रस्ता येथील हॉटेल जे डब्लू मेरिएट येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. या परिषदेसाठी  रोटरी इंटरनॅशनल’चे संचालक ए.एस. व्यंकटेश आणि डॉ. महेश कोटबागी, रोटरी डीस्ट्रीक्ट ३१३१ चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार, रोटरी डीस्ट्रीक्ट ३१३१ च्या  पब्लिक इमेज को- डिरेक्टर संगीता लालवाणी उपस्थित होते.

आपल्या या भेटीबाबत जोन्स म्हणाल्या, “ रोटरी क्लब इंडिया’ने गेल्या काही वर्षात अतिशय चांगली कामगिरी केली आहे.  ‘मदत  घेणारे ते मदत करणारे ’ असा अद्भुत प्रवास करत, रोटरी इंडिया’ने अतिशय चांगल्याप्रकारे स्वत:चा विकास केला असून, प्रत्येक प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी असणारा त्यांचा उत्साह वाखाणन्याजोगा आहे. या भेटीत मला त्यांच्या या प्रवासाबाबत जाणून घेता आले, याचा आनंद वाटत आहे,’’

रोटरी इंटरनॅशनल’तर्फे जगभरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शाश्वत विकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, बालकल्याण अशा सात विविध क्षेत्रात काही महत्वपूर्ण प्रकल्प राबविले जात आहे. भारताचा विचार करता, याठिकाणी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध प्रकल्प राबविले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

 सुर्या हॉस्पिटल येथे कर्करोगावरील रेडिओ थेरपी  मशीन’चे लोकार्पण

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना कर्करोगावरील रेडिओ थेरपी उपचार घेता यावे, यासाठी रोटरी  डीस्ट्रीकट ३१३१’तर्फे शानिवारवाडा येथील सूर्या हॉस्पिटल मध्ये ‘लिनिअर एक्सलेटर रेडिओथेरपी मशीन’  उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी रोटरीतर्फे ८ कोटी रुपये तर रुग्णालयाने ४ कोटी रुपये योगदान दिले आहे.  या माध्यमातून प्रतिमहिना १२०० रुग्णांना उपचार घेता येणार आहे. या उपचारासाठी सामान्यपणे तब्बल एक ते दीड लाख रुपये खर्च येतो मात्र सुर्यादत्ता हॉस्पिटल येथे पिवळा आणि केशरी रेशनकार्ड धारकांना हा उपचार विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. या संदर्भात रोटरी क्लब आणि रुग्णालय यांच्यामध्ये सात वर्षांचा करार करण्यात आला  आहे. शुक्रवारी, दिनांक २२ जुलै रोजी रोटरी इंटरनॅशनल’च्या पहिल्या महिला अध्यक्ष जेनिफर जोन्स यांच्या हस्ते या मशीनचे लोकार्पण करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading