Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विश्वात्मक, सर्वात्मक असे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे व्यक्तिमत्व – ह.भ.प. भगवतीताई सातारकर दांडेकर

पुणे : जगद्गुरु तुकाराम महाराज हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. विश्वात्मक, सर्वात्मक असे तुकाराम महाराज आहेत. सर्व अंगांनी परिपूर्ण अवतार कोणाचा असेल, तर तो तुकाराम महाराजांचा आहे. संतांचा अवतार होतो, पण त्यांचे कार्य काय, याचा विचार कायम त्यांच्या मनात सुरू असतो, असे मत ह.भ.प. भगवतीताई सातारकर – दांडेकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ह.भ.प. भगवतीताई सातारकर – दांडेकर यांनी जगद््गुरु तुकाराम महाराजांचे निवडक अभंग याविषयावर निरुपण केले.

भगवतीताई सातारकर – दांडेकर म्हणाल्या, बोधाची, प्रतीतीची स्पष्टता ज्यांच्यामध्ये असतात, बोध व प्रतीतीची प्रक्रिया जेथे पूर्ण होते, ते संत असतात. तुकाराम महाराजांनी साधे साधे अभंग रचले. तुकाराम महाराजांचे चरित्र वाचल्यावर असा संत होणे नाही, हेच प्रत्येकाला वाटते. पांडुरंग भक्तीत सर्व जगाला रंगविले आणि तुकोबाराय देखील रंगले.

त्या पुढे म्हणाल्या, प्रभू प्रेम, प्रतीती जी संतांकडे आहे, ती आपल्याकडे नाही, असे नाही. मात्र, त्याचे प्रमाण किती, हे महत्वाचे आहे. जो जीव म्हणून जन्माला आला आहे, त्याला कर्म त्यागता येत नाही. सत्तारूपाने व्यक्त होणे हा परमेश्वराचा अवतार आणि ज्यांच्याकडे बघून परामेश्वरही धावतो, तो संतांचा अवतार आहे.

चातुर्मास प्रवचनांतर्गत संपूर्ण हरिपाठ याविषयावर दिनांक १७ ते ३१ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ८ यावेळेत प्रवचने होत आहेत. यामध्ये ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर व ह.भ.प. भगवतीताई सातारकर – दांडेकर या निरुपण करीत आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading