PMP – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
पुणे : पीएमपीएमएल मार्फत पीएमपीएमएल व खासगी बस ठेकेदारांकडील चालकांसाठी अपघात विरहित सेवा देण्याबाबत गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या कार्यशाळेचा आज दि. ४ जुलै २०२२ रोजी समारोप झाला. या कार्यशाळेत पीएमपीएमएलच्या चार हजार चालकांचे प्रबोधन करण्यात आले. सदर समारोप कार्यक्रमाचे औचित्य साधून वाहन चालकांना प्रशिक्षण देण्याच्या कामकाजामध्ये आपल्या सेवा कार्यकाळात उत्कृष्ट काम करणारे पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा व महाराष्ट्र राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्या ;हस्ते ससाणे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुण्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र उपगनवाल, पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक सुबोध मेडसीकर, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक आकाश काबंळे, वाहतुक व नियोजन अधिकारी चंद्रकांत वरपे, चिफ मॅकेनिकल इंजिनीअर रमेश चव्हाण, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (कर्मशिअल) सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, झोनल मॅनेजर विक्रम शितोळे व पीएमपीएमएलचे सर्व विभाग प्रमुख, सर्व आगार व्यवस्थापक, सर्व सहाय्यक आगार व्यवस्थापक, सर्व आगार अभियंता यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकपर भाषणात पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक सुबोध मेडसीकर म्हणाले, “१९८३ साली सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक म्हणून सेवेत दाखल झालेले संजय ससाणे यांनी आपल्या सेवा काळात अनेक ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून आदर्शवत कामकाज केले आहे. रस्ता सुरक्षिततेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण कामकाज केले असुन अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्यांचा सन्मान होणे गरजेचे होते.”
महाराष्ट्र राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील म्हणाले, “ ससाणे हे जबाबदार अधिकारी होते. त्यांनी आजपर्यंत समाजसेवेचे भान ठेवून काम केले आहे. ससाणे यांचा पीएमपीएमएल कडून यथोचित सत्कार करण्यात आला हि त्यांच्या कामाची पोहोच पावती आहे.”
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, “ संजय ससाणे यांनी आपल्या सेवाकाळात लोकाभिमुख काम करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.” पीएमपीएमएलचे कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांनी सूत्रसंचालन केले. महाव्यवस्थापक सुबोध मेडसीकर यांनी प्रास्ताविक केले तर चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर दत्तात्रय झेंडे यांनी आभार मानले.
