fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

दत्त गुरु हे कलियुगातील प्रधान दैवत – प.पू. डॉ.सुनील काळे यांचे मत

पुणे : श्री दत्तमहाराज हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित प्रतिक आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ३३ कोटी देव आहेत. मात्र, दत्त गुरुंना कलियुगातील प्रधान दैवत मानले जाते. आपण स्वत:ला धार्मिक समजतो, मंदिरात जातो, प्रार्थना करतो. परंतु त्यापलिकडे असलेले दत्त महाराज आपण समजून घेणे गरजेचे असल्याचे मत प.पू.डॉ.सुनील काळे यांनी व्यक्त केले.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) गुरुपौर्णिमा उत्सवाचे उद््घाटन मंदिरासमोरील श्री दत्त कला मंच उत्सव मंडपात झाले. यावेळी पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, संगिता डहाळे, गौरी काळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, विश्वस्त अक्षय गोडसे, अमोल केदारी, मंगेश सूर्यवंशी, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्त महाराजांची आरती व दीपप्रज्वलन देखील झाले.

डॉ.राजेंद्र डहाळे म्हणाले, कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर केवळ धार्मिक कार्य नव्हे, तर सामाजिक प्रबोधनाचे कार्य देखील करीत आहे. मंदिराच्या माध्यमातून सामान्यांना काहीतरी चांगले देण्याचा हा प्रयत्न ट्रस्ट करीत असून यामधून प्रत्येकाला आत्मचिंतनाची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, दिनांक १३ जुलै पर्यंत दुपारी १ ते रात्री १० यावेळी दैनंदिन भजन, भक्ती गीत, सुगम संगीत व उदयोन्मुख कलाकारांचे तसेच इतर ललित कलांचे सादरीकरण मंदिरासमोरील श्री दत्त कला मंच येथे होणार आहे. तसेच दिनांक १३ जुलै रोजी मुख्य १२५ वा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होईल, असेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले.

श्री दत्त कलामंच येथे अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे करुणात्रिपदी, पंचपदी व घोरात्कष्टात मंत्र पठण झाले. यावेळी तेजस तराणेकर, हरी मुस्तीकर, सुभाष कुलकर्णी उपस्थित होते. गुरुपौर्णिमा सप्ताह शुभारंभानिमित्त बेलबाग चौकापासून मंदिरापर्यंत दुतर्फा श्री दत्त परंपरेतील अवतार असलेले पूजनीय श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, माणिकप्रभू, अक्कलकोट स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वस्ती टेंबे स्वामी, माधवनाथ महाराज, गजानन महाराज, साईबाबा, शंकरमहाराज, गोंदवलेकर महाराज, नाना महाराज तराणेकर तसेच नवनाथांच्या लावलेल्या आकर्षक तसबिरी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading