Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

ग्लॅमरस दुनियेपासून तरुणाईने सावध राहण्याची गरज

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व मराठवाडा कॉलेज आॅफ कॉमर्स महाविद्यालयाच्यावतीने जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोध दिनानिमित्त चर्चासत्रातील सूर

पुणे : तरुणाईमध्ये हुक्क्याची वाढणारी क्रेझ, ग्लॅमरच्या दुनियेचे वाढते आकर्षण आणि त्यातून वाढणारी व्यसनाधिनता याचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे यापासून परावृत्त होत मानसिक ताणातून वाढणारी व्यसनाधीनता, तरुणांची जागरुकता आणि समुपदेशनावर विद्यार्थी, मान्यवर आणि संस्थेच्या पदाधिका-यांनी चर्चा केली. सध्याच्या ग्लॅमरस दुनियेपासून तरुणाईने सावध राहून इतरांमध्ये देखील जनजागृती करावी, असा सूर चर्चासत्रात उमटला.

निमित्त होते, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि मराठवाडा कॉलेज आॅफ कॉमर्स महाविद्यालयाच्यावतीने जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोध दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित चर्चासत्राचे. डेक्कन जवळील महाविद्यालयाच्या सभागृहात हे चर्चासत्र पार पडले. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगरे, पोलीस उपनिरिक्षक दिगंबर चव्हाण, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, गणेश गावडे, किशन पारीख, प्रमोद शेळके, विशाल शिंदे, केतन जैन, संतोष पटवर्धन उपस्थित होते.

लक्ष्मण डेंगरे म्हणाले, आज तरुणांमध्ये हुक्का पार्लरमध्ये जाणे म्हणजे स्टायलिश, अशी क्रेझ वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण व्यसनाधिनतेकडे वळताना दिसतात. आपल्या आजूबाजूला असे कोणी असेल तर तुम्ही त्यांना व्यसनांकडे वळण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

दिगंबर चव्हाण म्हणाले, तुमच्या आजूबाजूला व्यसनांचा विळखा वाढत असला तरी तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही सावध राहून पोलिसांकडे अथवा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तक्रार केल्यास त्यावर जलदगतीने कारवाई केली जाईल.

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, व्यसन हा आजार आहे आणि त्यावर वेळीच उपचार केले तर तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडू शकता. वाढणा-या मानसिक तणावामुळे देखील तरुण व्यसनांकडे वळतात. तरुणाई हा देशाचा कणा आहे आणि या तरुणाईला व्यसनाची झालर नको असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading