पूजा चव्हाण प्रकरण : 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे असल्याचा राजेंद्र गायकवाडांचा दावा
मुंबई : सध्या शिंदे गटात असलेले बंडखोर आमदार व माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राठोड यांचे मंत्रीपद धोक्यात आणणाऱ्या पूजा चव्हाण प्रकरणातील 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. तसेच हा पुरावा पोलिसांकडे सादर करण्याची धमकी देखील त्यांनी दिली आहे.
पुण्यातील एका सोसायटीत टीकटॉक स्टार पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदसोडावे लागले होते. आता संजय राठोड गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे शिवसैनिक संपाले असून त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे. “या प्रकरणातील 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडे असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल”, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.
पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीला मारून संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली, पूजा चव्हाण वर त्याने कसे अत्याचार केले त्याचा पर्दाफाश करू असेही गायकवाड यांनी जाहीर भाषणात सांगितले. राठोड विरुद्ध गळा काढणारे भाजप नेते आणि चित्रा वाघ आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कसे बसणार असा सवालही गायकवाड यांनी केला. संजय राठोड यांनी गुवाहाटीतून मातोश्रीवर यावे आणि माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे.
