पुनीत बालन ग्रुपने भारतीय स्टार टेनिसपटू ऋतुजा भोसले सोबत केला करार !
पुणे : पुनीत बालन ग्रुपने भारतीय स्टार टेनिसपटू ऋतुजा भोसले सोबत करार केला आहे. पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनित बालन आणि ऋतुजा भोसले यांच्यात नुकताच करार करण्यात आला व एक नव्या पर्वाची सुरवात करत असल्याची घोषणा केली.
याबाबत अधिक माहिती देताना पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनीत बालन यांनी सांगितले की, पुणे शहराला टेनिसचा ऐतिहासिक वारसा आहे. या शहराने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे टेनिस खेळाडू निर्माण केले आहेत. मूळच्या अकलूजच्या असलेल्या परंतु पुण्यामध्ये टेनिसचे धडे घेतलेल्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या ऋतुजा भोसले हिला पुनित बालन ग्रुपच्यावतीने सक्रीय पाठींबा देण्यात येणार आहे.
पुनीत बालन यांनी सांगितले की, पुनीत बालन ग्रुप आणि क्रिडा क्षेत्राचा फार जवळचा संबंध आहे. पुण्यातील क्रिकेट क्षेत्रामध्ये पुनीत बालन ग्रुपच्यावतीने क्रिकेटची अॅकॅडमी सुरू करण्यात आली आहे. १२, १४ आणि १७ वर्षाखालील मुलांसाठी, मुलींसाठी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील खेळाडूंसाठी अनेक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. तसेच सायकलिंग, तायक्वांदो, शुटिंग, खो-खो, हँडबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस अश्या विविध क्रिडाप्रकारातील खेळाडूंना आर्थिक पाठींबा दिला जातो. ऋतुजा हिच्या सोबत करार करून ग्रुपने लॉन टेनिस क्रिडाप्रकारातही उडी घेतली आहे.
ऋतुजा भोसले यांनी सांगितले की, मी माझ्या व्यावसायिक टेनिसचा श्री-गणेशा पुण्यातूनच केला आणि येथूनच माझ्या कारकिर्दीची सुरूवात झाली. टेनिसचे धडे घेत व एक-एक पायरी पूर्ण करत मी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचले. पुनित बालन ग्रुपने माझ्यावर विश्वास दाखवत मला पाठींबा दिला, त्यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे. त्यांच्या या पाठींब्यामुळे पुढील वाटचालीसाठी मला अधिक उत्साह आणि ताकद मिळाली आहे.
