Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

बीएमसीसीत सुरू होणार बी. कॉम ऑनर्स चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम

पुणे :  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘बीकॉम ऑनर्स’ हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) सहकार्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार असल्याची माहिती बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी कळविली आहे.

पुरोहित म्हणाल्या, ‘सीए/सीएस/सीएमए असे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि सीएफए/सीपीए या सारख्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी ‘बीकॉम ऑनर्स’ पदवी उपयुक्त ठरणार आहे. हा अभ्यासक्रम १६० क्रेडिट गुणांचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण दिले जाणार असून, वाणिज्य व्यवस्थापन, वित्त, कॉस्ट अण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करप्रणाली, विधी, अर्थशास्त्र, उद्योजकता, व्यापार अशा विषयांचा समावेश असणार आहे. प्रवेशासाठी कोणत्याही बोर्डाची बारावीची परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी दिली जाणार आहे.’

आयसीएआयचे सेंट्रल कौन्सिल मेंबर चंद्रशेखर चितळे म्हणाले, ‘या अभ्यासक्रमासाठी बीएमसीसी आणि आयसीएआय यांच्यात सहकार्य करार करण्यात आला आहे. आयसीएआयच्या वतीने अभ्यासक्रम निश्चित करणे, महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना कौशल्यविकास मार्गदर्शन करणे आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’

या वेळी डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, बीएमसीसीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर फडके, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, सीए चंद्रशेखर चितळे, यशवंत कासार, काशीनाथ पठारे, अभ्यासक्रमाच्या समन्वयिका प्रा. वर्षा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading