शेतकरी, पत्रकार आणि शिक्षकाची ‘इर्सल’
फिल्म इंडस्ट्री सारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात खेडेगावातील सामान्य कुटूंबातील मुलांनी नशीब आजमावणे तसे विरळच. पण हे धारिष्ट्य केले आहे एका प्रयोगशील शेतकऱ्याने, अभ्यासू पत्रकाराने आणि ज्ञानदानाचा वसा घेतलेल्या एका शिक्षकाने. ‘राजकारणात गुलाला शिवाय मज्याचं नाय’अशी टॅगलाईन असलेला ‘इर्सल’ हा चित्रपट अनेक अडथळ्यांचे चक्रव्ह्यूव भेदून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा केवळ पॉलिटिकल थ्रीलर चित्रपट नाही तर दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे – विश्वास सुतार आणि गीत – संगीतकार दिनकर शिर्के यांच्या जिद्दीची ‘इर्सल’ आहे.
पेशाने शिक्षक असलेल्या गीत – संगीतकार दिनकर शिर्के यांच्या पुढाकारातून भलरी प्रॉडक्शन्सचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर दिग्दर्शनाची जबाबदारी साखरवाडी जवळच्या मुरूमचे प्रयोगशील शेतकरी असलेल्या अनिकेत बोंद्रे आणि साताऱ्याचे अभ्यासू पत्रकार विश्वास सुतार यांच्या खांद्यावर आली. पण हा प्रवास सोपा नव्हता.
पहिला फटका बसला नोटबंदीचा, नंतर दूसरा झटका बसला जीएसटीचा. दरम्यान चित्रपटाच शेड्यूल ठरलं होतं. कास्टिंग झालं होत. काही जणांना दिग्दर्शकांनी स्वतः अॅडवान्स दिले होते. मागे फिरणे शक्य नव्हते अशावेळी फेसबूकवर पोस्ट लिहून पब्लिक फंड जमा करण्याचे ठरले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. अन् ‘इर्सल’चे शुटींग सुरू झाले. विविध अडथळे पार करीत या तिघांनी चित्रपट निर्मितीचे शिवधनुष्य पेलले. चित्रपट तयार झाला. मात्र मोठे संकट कोसळले ते म्हणजे कोरोना काळातील लॉकडाऊनचे. अन् पुन्हा एकदा निराशेचे ढग जमा झाले. एकवेळ अशी ही आली की, चला जमीनीचा एक तुकडा विकुया पण चित्रपट रिलीज झाला पाहिजे अशी भावना अनिकेत बोंद्रे यांच्या मनात आली. अखेर ‘इर्सल’ ला राज फिल्म्स हे प्रस्तूतकर्ते मिळाले व आता येत्या 3 जून रोजी हा ‘इर्सल’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
