पीएमपीएमएल कडून कात्रज सर्पोद्यान ते सासवड मार्गे कापूरहोळ, बालाजी मंदिर, नारायणपूर नवीन बसमार्ग सुरू
पुणे : पीएमपीएमएल कडून आज (दि. ३) पासून कात्रज सर्पोद्यान ते सासवड मार्गे कापूरहोळ, बालाजी मंदिर, नारायणपूर हा नवीन बस मार्ग (मार्ग क्रमांक २९३) सुरू करण्यात आला. कात्रज येथे खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमरावआण्णा तापकीर यांच्या हस्ते या बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. तर नारायणपूर येथे श्री दत्तगुरूंच्या जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात बसचे स्वागत करण्यात आले व परमपूज्य श्री आण्णा महाराज यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.
कात्रज येथे झालेल्या उदघाटन सोहळ्यास नगरसेविका वर्षा तापकीर, माजी नगरसेविका मोहिनी देवकर, उद्योजक सत्यवान कामठे, अभिषेक तापकीर, सामाजिक कार्यकर्ते गणेश भिंताडे, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कात्रज डेपो मॅनेजर विजय रांजणे, असिस्टंट डेपो मॅनेजर शैलेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
कात्रज सर्पोद्यान ते सासवड या बससेवेचा मार्ग – कात्रज सर्पोद्यान, वेळू फाटा, शिवापूर बाग, कोंढणपूर फाटा, खेड शिवापूर, वरवे, केळवडे फाटा, चेलाडी फाटा, कामथडी, कापूरहोळ, दिवळे, बालाजी मंदिर फाटा, केतकावळे, देवडी, चिव्हेवाडी, नारायण धाम, नारायणपूर, पोखर फाटा, भिवडी, वांढेकर वस्ती, घोरेवाडी, सासवड कोर्ट, चौखंडे आळी, जेजुरी नाका, सासवड असा असणार आहे.
बसचे वेळापत्रक – कात्रज सर्पोद्यान ते सासवड पहिली बस सकाळी ५.०० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ८.३० वा. आहे. तसेच सासवड ते कात्रज सर्पोद्यान पहिली बस सकाळी ९.३० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ७.३० वा. आहे. सासवड ते कापूरहोळ पहिली बस सकाळी ६.३० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ७.३० वा. आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार भिमराव तापकीर म्हणाले, या नवीन बसमार्गामुळे नारायणपूर व बालाजी मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची तसेच कापूरहोळ ते सासवड दरम्यानच्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे. हा बसमार्ग अखंडपणे चालू रहावा यासाठी या बससेवेला चांगला प्रतिसाद द्या असे आवाहनही त्यांनी केले.
पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, सध्या या बसमार्गावर ३ बसेसद्वारे बससेवा उपलब्ध आहे. कात्रज सर्पोद्यान येथून साधारणपणे दर ६० मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. कात्रज सर्पोद्यान ते सासवड १२ खेपा व कापूरहोळ ते सासवड १६ खेपा होणार आहेत. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील.
