fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

स्वच्छ सर्वेक्षण : 2021 सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर

जुन्नर, शिरूर, लोणावळा, सासवड, जेजुरी, इंदापूर ठरली कचरा मुक्त शहरे

पुणे : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरे मध्ये जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड या शहरांना 9 नोव्हेंबर रोजी देशपातळीवर सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जुन्नर, शिरूर, लोणावळा, सासवड, जेजुरी, इंदापूर या शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे पुरस्कृत करण्यात येणार आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने पर्यटकांमुळे होणाऱ्या कचऱ्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती आकारणी करत दंड आकारला. लोणावळा शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात. शहरातील सांडपाणी प्रक्रियेसाठी नगरपरिषदेमार्फत एसटीपी प्रकल्प आणि एफएसटीपी प्रकल्प डोंगरगाव येथे बांधण्यात आला आहे. एकूण 40 शौचालयांपैकी 10 शौचालये ताराकिंत शौचालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सासवड नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो. प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना अल्पदरात पुर्नवापरयोग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या.

कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत 600 लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत.  सासवड नगरपरिषदेने शहरामध्ये 6 हजारहून अधिक वृक्षांची लागवड व जोपासना केलेली आहे. प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने सणांच्या दिवसांमध्ये पर्यावरणपूरक मुर्ती निर्माल्य संकलन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading