fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsPUNE

महापुरुषांचे कार्य लोकांसमोर मांडण्याचा उपक्रम स्तुत्य – रामदास आठवले

पुणे : “राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य फार मोठे आहे. शाहू महाराजांच्या सहकार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले आणि डॉ. आंबेडकरांच्या आदर्शातून अण्णाभाऊंनी प्रगल्भ साहित्य निर्मिले. अशा दोन महापुरुषांना या देखण्या स्मारकातून लोकांपुढे आणण्याचा उपक्रम स्तुत्य आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या विकासनिधी व संकल्पनेतून प्रभाग क्रमांक ८, औंध-बोपोडी येथे साकारलेल्या राजर्षी शाहू महाराज चौक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य कट्ट्याचे लोकार्पण आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री अविनाश महातेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनावणे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, गेल्या पाच वर्षात ‘रिपाइं’च्या तिघांना उपमहापौर होण्याची संधी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. भाजप हा संविधानाला मानणारा, दलितांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक होतात. त्यामुळे ‘रिपाइं’ भाजपसोबत आहे. येणाऱ्या निवडणुकीतही पुण्याची महापालिका भाजप-रिपाइंच्या युतीच्या हाती यावी, यासाठी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून पक्ष संघटन मजबूत करावे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, बोपोडी भागातील नागरी समस्यांची जाण असल्याने वाडेकर यांनी महापालिकेच्या माध्यमातून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. उपमहापौर झाल्यानंतर शहराच्या इतर भागातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार महत्वाचा आहे. सातत्याने पालिकेतही नागरी समस्यांच्या बाबतीत आवाज उठवण्याचे काम वाडेकर यांनी केले आहे. पुणे महापालिकेने गेल्या दोन वर्षात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा गौरव झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत दोन नाही, चार पक्ष एकत्र आलें, तरी भाजप-रिपाइंचीच सत्ता पालिकेत येईल.

अविनाश महातेकर यांनी अण्णाभाऊ साठे साहित्यकट्टा म्हणजे आंबेडकरी विचाराला साजेशे असे स्मारक आहे. यातून अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर होईल, असे सांगितले. तर वाडेकर दाम्पत्याने समाजासाठी वाहून घेतले असून, तळमळीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी दोघेही काम करत असल्याचे सिद्धार्थ शिरोळे यांनी नमूद केले. परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading