Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

 हॉटेल्स, दुकाने यांच्या वेळा वाढणार; अम्युझमेंट पार्क 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील हॉटेल्स, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत आज विचार करण्यात आला. त्यामुळे येत्या काळात हॉटेल्स, दुकाने यांच्या वेळा वाढण्याची आशा आहे.  तसेच आज अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. त्यामुळे थिएटर सोबतच अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे.

वर्षा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्णसंख्या कमी होतांना दिसते आहे. 22 ऑक्टोबरपासून थिएटर  सुरू करीत आहोत. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. उपाहारगृहे व दुकाने यांच्या देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या.

दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading