fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

परस्पर सहकार्यातून राज्यातील रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करुया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर  : महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीत काही रस्ते-रेल्वे मार्ग नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्त करताना तसेच नवे रस्ते करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. यासाठी राज्य व केंद्र सरकार समन्वयातून काम करेल. देशभर उच्च दर्जाच्या महामार्गांच्या निर्मितीचे कार्य रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी करीत आहेत. या परिस्थितीत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग राज्याच्या दर्जात्मक रस्ते निर्मितीसाठी होईल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. नागपूर-नागभीड रेल्वे मार्गावरील कोट्यवधीच्या महत्वाकांक्षी उड्डाण पुलांच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

उत्तर नागपूर मधील वाहतुकीची कोंडी कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यानच्या जवळपास तीन किलोमीटर लांबीच्या १४६ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाण पुलाचे आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते भूमीपूजन झाले. महाराष्ट्र राज्य रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (महारेल) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या शानदार भूमीपूजन सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दूरस्थ प्रणालीद्वारे तसेच राज्याचे ऊर्जा तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास कुंभारे, राजू पारवे, कृष्णा खोपडे, मोहन मते, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराचे भाषणात कौतुक केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या दर्जेदार कामाचे कौतुक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते याची आठवण सांगितली. सोबतच राज्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची आठवण करुन देत सध्या कोरोनासोबतच नैसर्गिक  आपत्तीशी महाराष्ट्र झुंजत आहे. तौक्ते वादळाचे, पूर अतिवृष्टीचे संकट, खचणारे रस्ते, दरडी यातून राज्य निश्चितच सावरेल. मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून अनेक पिढ्यांसाठी टिकेल अशा नवीन तंत्रज्ञानाने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

समृद्धी महामार्गामुळे राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर जवळ येत आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम दृष्टीपथात आहे. मात्र नव्या पायाभूत सुविधा उभ्या राहत असताना सामान्य नागरिकांची काळजी घेतो तशीच काळजी वन्यजीव व वन्य प्राण्यांचीही घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नागभीड येथे ब्रॉडगेज तयार करताना ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जंगलामध्ये उन्नत मार्गाचा वापर करा. जेणेकरुन वन्यजीव, वनसंपदा यांचे नुकसान होणार नाही. निसर्ग व पर्यावरणपूरक नवतंत्रज्ञानाची जोड असलेले रस्ते हे दिर्घकालीन प्रगतीसाठी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी संबोधित करताना या प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. राज्याचे ऊर्जा मंत्री व ऊर्जा विभागाने यासाठी केलेली मदत उल्लेखनीय आहे. उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करताना या ठिकाणचे अतिक्रमण अडचण ठरणार नाही, यासाठी स्थानिक नेत्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. नागपूर ते वडसा हा ब्रॉडगेज मार्ग पूर्णत्वास जाईल. सोबतच उमरेड पुढील भिवापूर पर्यंतच्या चार पदरी रस्ते मार्गामध्ये वने व पर्यावरण विभागाच्या आक्षेपांची पूर्तता झाल्यास हा रस्ता देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले.

अशोक चव्हाण यांनी यावेळी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नितीन गडकरी यांनी समृद्धी महामार्गाला जालना येथून मराठवाड्याला जोडण्याचे आवाहन केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading