गणेश बिडकर यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेड कडून निषेध
मनुस्मृती समर्थक भाजपचे गणेश बिडकर ‘राज्यघटना अरबी समुद्रात बुडवा…’ म्हणतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. भाजपाला भारतीय संविधान मान्य नाही हे संपूर्ण देशाला माहिती आहे. म्हणूनच दिल्लीत संविधान फाडला गेलं. त्याच पक्षाचे गणेश बिडकर ऑनलाईन (Online) चर्चेमध्ये दोन वेळेस ‘राज्य घटना बुडवा’ असं वक्तव्य करतात… हे संतापजनक असून या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी जाहीर निषेध केला आहे.
भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊनच स्वीकृत नगरसेवक असताना गणेश बिडकर मागच्या दरवाजाने पुणे महानगरपालिकेत सभागृहनेते झाले, हे उपकार गणेश बिडकर विकासाच्या खोट्या गप्पा मारताना विसरले. पुण्याची वाट लावणारे नेते जर संविधानाचा अवमान करत असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही. भारतीय संविधानाचा अर्थात राज्यघटनेचा अवमान केल्याप्रकरणी गणेश बिडकर यांनी तात्काळ माफी मागावी व पुणे पोलिसांनी स्वतःहून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
‘राज्यघटना अरबी समुद्रात बुडवा…’ हे वक्तव्य अत्यंत संतापजनक असून आमच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी संभाजी ब्रिगेड लवकरच पोलिसात तक्रार करणार आहे.
