काळाप्रमाणे शिक्षकांनी देखील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा – डॉ.एम.जी. ताकवले
पुणे : जगातील सध्याची परिस्थिती पाहता शिक्षणाची पद्धत पूर्ण बदलली आहे. आज शिक्षणाच्या कक्षा वृंदावल्या आहेत. तुम्ही दिलेले शिक्षण हे फक्त तुमच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. त्यामुळे शिक्षकांनी देखील काळानुसार स्वत:मध्ये बदल करून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. त्याचबरोबर शिक्षणाची गुणवत्ता कमी न होऊ देता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम शिक्षण दिले पाहिजे, असे मत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ.एम.जी. ताकवले यांनी व्यक्त केले.
पुणे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक व संघाच्या सेवानिवृत्त पदाधिकाºयांचा सन्मान सोमवार पेठेतील संघाच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी संघाचे मार्गदर्शक हरिश्चंद्र गायकवाड, शांताराम पोखरकर, चंद्रकांत मोहोळ, अनिता साळुंके, उपाध्यक्ष शिवाजी शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पुस्तक असे सन्मानाचे स्वरूप होते.
डॉ.एम.जी. ताकवले ताकवले म्हणाले, आज काळाच्या गरजेप्रमाणे आॅनलाईन शिक्षणपद्धती आली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कारण विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या हे शिक्षक उत्तमरित्या समजू शकतात आणि त्यांना मदत करू शकतात. शिक्षकांची खरी संपत्ती हे त्यांचे ज्ञान आणि विद्यार्थ्यांचे पाठबळ असते. आनंदी जीवन जगण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपले छंद जोपासले, असे देखील त्यांनी सांगितले.
प्राचार्य चंद्रकांत मोहोळ, प्राचार्य अविनाश ताकवले, सुरेखा सोनावणे, मंगला राऊत, प्रभाकर कुंभार या पुणे शहर मुख्याध्यापक संघाच्या सेवानिवृत्त पदाधिकाºयांचा सन्मान करण्यात आला. संजीवनी ओमासे, रामकृष्ण शिंदे, दिलीपकुमार पांगे, कृष्णा पाटील, जयश्री गिरी, अभंग तात्याबा, प्रल्हाद मानकर या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
प्राचार्य चंद्रकांत मोहोळ, प्राचार्य अविनाश ताकवले व इतर मुख्याध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी कामथे यांनी सूत्रसंचालन केले, अनिता साळुंके यांनी प्रास्ताविक केले, सुजित जगताप यांनी आभार मानले.
