Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

स्वर आणि शब्द यांचा मिलाप दिर्घकाळ टिकणारा-ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे यांचे मत

पुणे : शाहिरी ही खास मराठी कला आहे. वीरश्री युक्त काव्य यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात संगीत व काव्यात्मक गोष्टी दिर्घकाळ टिकतात. त्यामुळे स्वर आणि शब्द यांचा दिर्घकाळ टिकणारा मिलाप हा शाहिरीमध्ये पहायला मिळतो, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे यांनी व्यक्त केले. 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कसबा पेठेतील नामदेव शिंपी कार्यालय येथे ‘शाहिरी निनाद’ या अंकाचे प्रकाशन रवींद्र खरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

रवींद्र खरे म्हणाले, स्वर आणि शब्द दिर्घकाळ टिकत असल्याचे भारतीय विज्ञान व इतिहास हा काव्यबद्ध करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळेच आपली काव्यं जीवंत राहिली. शाहिरी ही त्याचे अनुसरण करणारी कला आहे. शौर्य आणि भक्ती हे आपल्याला शाहिरीतून बघायला मिळते. मात्र, ते सादरीकरण करण्याकरीता मोठा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. शाहिराकडे असलेला आत्मविश्वास आणि आवाजाची फेक ही शाहिरीमध्ये महत्वाची आहे. समाजाला जागृत करीत चेतवण्याची कला शाहिरीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहीर म्हणून आपला बाणा कडक असणे गरजेचे आहे. शाहिरी निनाद अंकामध्ये कोविड काळात कलावंतांसाठी केलेल्या कामाची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.संगीता मावळे म्हणाल्या, शाहिरीचा प्रचार आणि प्रसार करणारी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही महाराष्ट्रातील अग्रणी संस्था आहे. वर्षभर प्रबोधिनीचे अनेक उत्सव होतात. शाहिरी कला तळागाळात पोहोचविण्याचा प्रयत्न प्रबोधिनीतर्फे केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading