गुंतवणुकदार सुविधा केंद्र योजना स्वागतार्ह – प्रशांत गिरबाने
पुणे – गुंतवणुकदार सुविधा केंद्र ही महापालिकेची योजना स्वागतार्ह असून ती लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी, अशी अपेक्षा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे डायरेक्टर जनरल प्रशांत गिरबाने यांनी ‘अर्बन चर्चा’ या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
शहरातील उद्योजक, व्यापारी, नगररचनाकार, नगररचना तज्ज्ञ अशा विविध घटकांशी संवाद साधणारा ‘अर्बन चर्चा’ हा उपक्रम आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सुरु केला आहे. पुण्याच्या विकासाबाबत विविध तज्ज्ञांची मते आणि अपेक्षा या कार्यक्रमातून मांडल्या जातील. विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला. दर पंधरा दिवसांनी पॉडकास्ट प्रणालीद्वारे आमदार शिरोळे तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ प्रशांत गिरबाने यांच्याशी संवाद साधून करण्यात आला.
गुंतवणुकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक देशांमध्ये तेथील स्थानिक स्वराज्य संस्था पुढाकार घेतात. त्याचा फायदा त्या-त्या शहरांना निश्चित होतो. याच धर्तीवर पुणे महापालिकेने गुंतवणुकदार सुविधा केंद्र स्थापन करण्याची घोषणा अंदाजपत्रकात जाहीर केली ती स्वागतार्ह आहे. ते केंद्र लवकर कार्यान्वित व्हावे. अनेक गुंतवणूकदार पुण्यात येण्यास उत्सुक असल्याने त्यांच्यासाठी हे केंद्र फायदेशीर ठरेल, शिवाय त्यातून गुंतवणूक वाढल्याने रोजगार निर्मिती होईल आणि महापालिकेचे उत्पन्नही वाढेल, असे गिरबाने यांनी सांगितले.
शहर विकासासाठी उद्योजक, उद्योजकांच्या संस्था यांच्यात निरंतर संवाद व्हायला हवा. अशा संवादातून शहर विकासाच्या अनेक योजना मांडल्या जातील. त्यातील चांगल्या आणि व्यवहार्य योजनांची अंमलबजावणी महापालिकेने केली तर शहराला निश्चित फायदा होऊ शकेल. महापालिकेलाही अशा संवादांमधून तंत्रज्ञांचा सल्ला घेता येईल. महापालिकेचे ५० ते ६०हजार कोटींच्या प्रकल्पांचे काम चालू आहे तसेच काही प्रकल्प प्रस्तावित आहेत ते मार्गी लागण्यासाठी असा समन्वय उपयोगी ठरेल असा विश्वास गिरबाने यांनी व्यक्त केला. अशा पद्धतीच्या समन्वयात सातत्य राहिल्यास लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यात कामाचे ‘कल्चर’ तयार होईल असे मत व्यक्त करुन आमदार शिरोळे यांनी गिरबाने यांच्या सूचनेचे स्वागत केले.
पुण्याच्या विकासासाठी दोन रिंग रोड, सहा एक्स्प्रेस वे असावेत, पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम झपाट्याने व्हावे, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर चार ट्रॅक व्हावेत, नवीन विमानतळाचे काम लवकर व्हावे, अशी अपेक्षा गिरबाने यांनी या चर्चेत बोलताना व्यक्त केली.
विकासासाठी केवळ शहराचा विचार न करता त्याच्या आसपासच्या परिसराचाही एकात्मिक विचार करायला हवा असे मत मांडून आमदार शिरोळे यांनी गिरबाने यांच्या सूचनांचे समर्थन केले.
