पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली खडकवासला धरण 100 टक्के भरले
पुणे: राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यात देखील पावसाचा जोर कायम राहिला आहे. खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला.
खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने तेथून सातत्याने विसर्ग सुरू आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने वेगाने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास 24 हजार 56 क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू होता.अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी माहिती दिली.
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने शिवणे पूल आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.यामुळे डेक्कन येथी बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मात्र आज सकाळपासून पाण्याचा वेग पुन्हा कमी करण्यात आला. सध्या खडकवासला धरणातून 9339 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना तसेच गावांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.
