Pune -ऑगस्ट महिन्यात मिळणार 15 लाख लसीचे डोस

पुणे – पुणे जिल्ह्याला ऑगस्ट महिन्यात करोना प्रतिबंधक लसीचे 15 लाख डोस मिळण्याची शक्‍यता आहे. खासगी रुग्णालयांसाठीही ते उपलब्ध करून देता येतील, अशी माहिती पुणे परिमंडळचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय देशमुख यांनी दिली.

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरणाची गती कमी झाली होती. केवळ कोवॅक्‍सिनचेच डोस उपलब्ध होते. कोवॅक्‍सिनचे डोस मुळातच कमी येत असल्याने त्याचे सहाच केंद्र शहरात सुरू ठेवण्यात आले होते.

जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास डिसेंबरपर्यंत सर्व लाभार्थींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार नाही.

लस उत्पादकांनी ऑगस्टमध्ये राज्याला 68 लाख लसीचे डोस देण्याचे मंजूर केले आहे. त्यापैकी 15 लाख डोस पुणे जिल्ह्यासाठी मिळतील. या महिन्यात आतापर्यंत आपल्याला 5 लाख 17 हजार कोविशील्ड लसीचे डोस मिळाले आहेत.

तर, 45 हजार कोवॅक्‍सिनचे डोस मिळाल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यातील छोट्या रुग्णालयांना ज्यांना दरमहा 6 हजार डोसची आवश्‍यकता असते. त्यांना ते डोस आरोग्य खात्याकडून पुरवले जातील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

दरम्यान, बुधवारी पुणे जिल्ह्यात 21 शासकीय तर 132 खासगी अशा 153 ठिकाणी लसीकरण प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी दिवसभरात 16 हजार जणांना लस देण्यात आली.

आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 57 लाख 3 हजार डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 43 लाख 72 हजार जणांना पहिला, तर 13 लाख 31 हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: