Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा

पंढरपूर : कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत.
या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.

आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांचे पंढरपुरात आगमन झाले असून शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे,  डॉ. दिलीप पांढरपट्टे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळित होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा. ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खाजगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवा , अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महिनाभरात कोरोना रूग्ण नसणाऱ्या गावात 6 वी ते 12 वीचे वर्ग सुरू केल्याची माहिती श्री. स्वामी यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी झाडाखाली, पारावर शाळा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading