सलग तिसऱ्या दिवशी पावसाने मुंबईला झोडपले, नद्यांना पूर, रेल्वे -रस्ते वाहतूक विस्कळीत  

  • संजय गांधी नॅशनल पार्कमधील दहिसर नदीला पूर

  • अंबरनाथमध्ये वालधुनी नदीच्या पाणी पातळीत वाढ 

  • विरार पूर्वेच्या पांढरतारा नदीला पूर

  • बदलापूरची चौपाटी पाण्याखाली

  • मुंब्रा-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी बंद

  • माथेरान घाटात दरड कोसळून भुसख्खलन

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे.  आजही पावसाचा जोर कायम असून सतत तीन दिवस बरसणाऱ्या पावसाने मुबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. पावसामुळे मुंबई भावतालच्या जवळपास सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या दहिसर नदीला पूर आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते नाहूर स्टेनश दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. मुंब्रा-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्येही पाणी शिरले आहे.अंबरनाथमध्ये वालधुनी नदी दुथडी भरून वाहत आहे. तर बदलापूरची चौपाटी उल्हास नदीच्या पाण्याखाली गेली आहे.  शिवाय वेधशाळेनेही मुंबईत रेड अलर्ट जारी केला असल्याने मुंबईसाठी पुढचे काही तास कठीण असणार आहेत.

संजय गांधी नॅशनल पार्कमधील दहिसर नदीला पूर

संजय गांधी नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या दहिसर नदीला पूर आला आहे. त्यामुळे येथील वसाहत आणि कार्यालयात पाणी शिरले आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिला तर प्रशासनाला परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागेल. दुसरया पोईसर नदीच्याही पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कांदिवली पश्चिमेतील मैदानातही मोठ्या प्रमाणावर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीच्या पाणी पातळीत वाढ

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर जलमय झाले आहे. शिवमंदिरात जाणारे पूल सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. कालपासून डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. या नदीला मोठा प्रवाह आला आहे.

बदलापूरची चौपाटी उल्हास नदीच्या पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा प्रवाह आला आहे. त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बदलापूरची उल्हास नदी चौपाटी सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.
 
मुंब्रा-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी बंद
 
मुंब्रा-पनवेल महामार्ग आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आला आहे. मुंब्रा-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आल्‍याची माहिती पोलिसांनी एक व्हिडिओसह ट्विट करून दिली आहे. कळवा, दिधा,मुंब्रा, कोसा, शिळफाटा, डोंबिवली, बदलापूर आदी ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे वाहतूक पोलीसांनी या परिस्थितीचा आढावा घेत एक व्हिडिओ ट्टिट करत मुंब्रा पनवेल महामार्गाची वाहतूक पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्‍यात आला. यामुळे मुंब्रा मार्गाने नवी मुंबई,पनवेल,कळंबोली, जेएनपीटी, तळोजा, एमआयडीसी,कळंबोली स्टील मार्केटकडे आणि पुणे, गोवा महामार्गाकडे जाणा-या सर्व वाहनांना बंदी केली आहे.

माथेरान घाटात दरड कोसळून भुसख्खलन

माथेरानमधील घाटात दरड कोसळून भुसख्खलन झाले आहे. नेरळ ते माथेरानला जाणाऱ्या घाटातील एकमेव मार्गावर मोठ-मोठाली दरड कोसळलयाने रस्ता बदं झाला आहे. माथेरानकडे जाण्यायेण्याचा सपंर्क रास्ता बंद असल्याने संपर्क तुटला आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: