Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी; धोकादायक घरातील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. याची माहिती मिळताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. धोकादायक घरातील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा तसेच दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांसाठी तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला आदित्य ठाकरे यांनी दिले.

दुर्घटनेनंतर ठाकरे यांनी चेंबूर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, स्थानिक नगरसेवक उमेश माने, निधी शिंदे, राजेश्वरी रेडकर, दीपमाला बडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, रात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading