‘बजाज अलियान्झ लाइफ’ने पॉलिसी खरेदी केली सुलभ
पुणे : भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने, आयुर्विम्याची पॉलिसी ग्राहकांना देताना त्यांच्या तात्काळ पडताळणीसाठी ‘नो यूअर कस्टमर’ची (केवायसी) प्रक्रिया शंभर टक्के पेपरलेस व डिजिटल स्वरुपात करण्यास सुरुवात केली आहे. आता विमा पॉलिसी खरेदी करताना ग्राहक आपल्या आधार कार्डाचे तपशील विमा कंपनीला प्रदान करून, ‘ई-केवायसी’ प्रक्रियेद्वारे आपली ओळख डिजिटलपणे कोठूनही, कधीही पटवून देऊ शकतात.
‘ई-केवायसी’ पद्धतीमुळे आपली ओळख आणि पत्ता यांची पुष्टी करण्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करण्याची ग्राहकांना गरज राहणार नाही. ‘यूआयडीएआय’कडे नोंद झालेले आधारचे तपशील त्यांना कंपनीकडे सादर करता येतील. ‘ई-केवायसी’च्या अंमलबजावणीनंतर आता ‘बजाज अलियान्झ लाइफ’ची पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ओळखपत्र, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आदी कागदपत्रे प्रत्यक्षात सादर करायची गरज लागणार नाही व विमा खरेदीची त्यांची प्रक्रिया अखंडित व सोप्या रितीने होत असल्याचा त्यांना अनुभव येईल. आधार कार्डाचे तपशील अचूकपणे सादर केल्यास, ‘यूआयडीएआय’कडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे विमा कंपनीकडील अर्जात ग्राहकाचे नाव, जन्मतारीख, पत्ता अशा काही बाबी आपोआप भरल्या जातील आणि त्यामुळे विमा पॉलिसीचा अर्ज दाखल होण्यास लागणाऱ्या वेळेची बचत होईल.
‘ई-केवायसी’ उपक्रमाबद्दल माहिती देताना, ‘बजाज अलियान्झ लाइफ’चे कार्यचालन व ग्राहक अनुभव विभागाचे प्रमुख कैझाद हिरामणेक म्हणाले, “बजाज अलियान्झ लाइफमध्ये, आमच्या ग्राहकांचे आमच्याशी असलेले नाते प्रत्येक वेळी सुरळीतपणे पुढे नेता यावे, यासाठी आमचे अविरत प्रयत्न सुरू असतात. ‘ई-केवायसी’च्या अंमलबजावणीमुळे हा सुरळीतपणाचा अनुभव त्यांना सुरुवातीपासूनच मिळत राहील, याचा आम्हाला आनंद आहे. आमच्यासोबत प्रत्येक वेळी सुखसुविधा देण्यास आम्ही सक्षम आहोत, याची आम्ही खात्री देतो. हे वचन पाळण्याच्या दृष्टीने आम्ही यापुढेही अनेक डिजिटल सेवा पुरविणार आहोत आणि त्यातून सोपे, सुरक्षित व प्रभावी मार्ग उपलब्ध करून त्यांच्याशी आम्ही जोडलेले राहणार आहोत.”
आधार आधारित ‘ई-केवायसी’ पडताळणीचा वापर करण्यासाठी, सर्व ग्राहकांनी विमा पॉलिसी खरेदी करताना त्यांचा आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. ‘यूआयडीएआय’च्या माध्यमातून आपली माहिती उपलब्ध करू देण्यास ग्राहकांनी ‘बजाज अलियान्झ लाइफ’ला संमतीही द्यायला हवी. ‘यूआयडीएआय’च्या यशस्वी प्रमाणीकरणानंतरच, ‘यूआयडीएआय’कडील ग्राहकांची माहिती ‘ई-केवायसी’साठी विमा कंपनीकडे प्रदर्शित होते.
