Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ‘कोरोना’ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण जिल्हा मुख्यालयाच्या आवारामध्ये पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या बाणेर रोड व पाषाण रोड येथील दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी.एस. रवी उपस्थितीत होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल नेहमीच तत्पर असते. कोरोनाचे संकट परतवण्यासाठी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून पालन व्हावे या करीता प्रयत्न करीत असतात.  पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे. पोलीस दलावर नागरिकांचा प्रचंड विश्वास असून लाचखोरी, भ्रष्टाचार व खंडणी अशा अप्रवृत्तीला बळी पडता कामा नये. पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजे, पर्यावरणाचा विचार करता, काळाची गरज लक्षात घेता स्वतंत्र सीएनजी पेट्रोल पंप व चार्जिंग स्टेशन उभारणीवर भर दिला पाहिजे. राज्यशासनाने इलेक्ट्रीकल वाहनाच्या वापराकरीता अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात जवळपास 700 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पोलीस दलातील शिपाई पोलीस आजच्यामितीला सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवानिवृत्त होतो. यापुढे उपनिरीक्षक पदावर सेवानिवृत्त झाला पाहिजे, असा प्रस्ताव गृह विभागाच्यावतीने तयार करण्यात येत आहे. 

 

पोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मान पदक प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, अशोक धुमाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस हवालदार संतोष बगाड व पोलीस शिपाई सुलतान डांगे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading