Pune – चिंताजनक शहरात आज 500 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
पुणे: पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शहरात लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. निर्बंध शिथील केल्यानंतर पुणे शहरातील रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी दोनशे ते तीनशेच्या दरम्यान असणारी रुग्ण संख्या आज पाचशेच्या वर गेली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निम्याने घटली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 508 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 266 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 78 हजार 517 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 67 हजार 372 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8588 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2557 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 287 रुग्ण गंभीर आहेत. तर 422 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 6707 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
