Pune – कलाकारांनी नटराजाकडे रंगमंदिरांचा पडदा उघण्यासाठी घातले साकडे
पुणे : एरवी थाटामाटात सलग तीन दिवस साजरा होणारा बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिराचा हा 54 वा वर्धापनदिन होता. करोनामुळे जवळपास दोन वर्षांपासून रंगमंदीर हे बंद आहे. या पार्श्वभूमीवर आज कलाकारांनी नटराजाकडे पडदा उघण्यासाठी साकडे घातले.
शासनाच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करून पुण्याचे उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले ,जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, जेष्ठ अभिनेत्री रजनी भट,अभिनेते विजय पटवर्धन, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते,निर्माते दत्ता दळवी, शशी कोठावळे सुमित कॅसेट चे सुभाष परदेशी,कलाकेंद्राचे अशोक जाधव,अण्णा गुंजाळ,सुनील महाजन,जतीन पांडे, प्रकाश पायगुडे,योगेश देशमुख,योगेश सुपेकर नाट्य चित्रपट परिवारातील मोजकेच पदाधिकारी व सदस्य एकत्र येऊन हा सोहळा साजरा केला.
यावेळी बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पुजन करण्यात आले. तसेच सर्व कलाकारांनी नेहमी प्रमाणे बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिन निमित्ताने केक कापून साजरा केला तसेच यावेळी उपमहापौरांनी कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू व कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी मेघराज राजेभोसले यांनी मागील वर्धापणदिनाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच म्हणाले, महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रिकामे गाळे गरजू कलाकारांना नाममात्र शुल्कात भाडे तत्वावर देण्यात यावे. तसेच कलाकारांना शहरी गरीब योजनेचा थेट लाभ मिळावा, छोटे खाणी स्वरुपात महानगर पालिकेच्या हद्दीत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली.
