राज्याच्या गावागावात क्रीडासंस्कृती पोहचवण्याचा जागतिक ऑलिंपिंक दिनाच्या निमित्तानं निर्धार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : “खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खेळ माणसाला सुसंस्कृत बनवतात, आनंदानं जगायला शिकवतात. खेळ माणसाला शरीरानं, मनानं तंदुरुस्त ठेवतात. एकता, समता, बंधुता, खिलाडूवृत्तीनं वागण्याची शिकवण खेळांमुळे मिळते. सुसंस्कृत, समर्थ, सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्यानं महाराष्ट्राच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती पोहचली, रुजली, वाढली पाहिजे. असं झालं तरंच देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येन निर्माण होतील. महाराष्ट्राचं नाव उज्वल करतील. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचा निर्धार आज जागतिक ऑलिंपिक दिनी करुया” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, आज जागतिक ऑलिंपिक दिन साजरा करत असताना, १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव साहेबांची मला आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपानं देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक महाराष्ट्रानं मिळवून दिलं होतं. ही बाब आनंदाची, अभिमानाची आहे. येत्या जुलै महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्रातून सात खेळाडू सहभागी होत आहेत. हे मोठे खेळाडू आहेत. त्यांनी मेहनत घेतली आहे. पदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची त्यांची जिद्द आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीनं या खेळाडूंच्या पाठीशी उभं आहे. महाराष्ट्राचे खेळाडू टोकियो ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करुन देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी टोकियो ऑलिंपिकमधील यशासाठी महाराष्ट्राच्या, देशाच्या ऑलिंपिक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीनं जात असताना, सर्व खेळाडूंनी, प्रशिक्षक, मॅनेजर, संपूर्ण टीमनं कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी. जपानमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी असलं तरी अनेक देशातून तिथं खेळाडू येणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूंन, सपोर्ट टीमच्या सदस्यांनी आपली व सहकाऱ्यांची काळजी घ्या. कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करा. स्वत:ला, सहकाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
आजच्या जागतिक ऑलिंपिक दिनी आपण स्वत:ला व कुटुंबाला कोरोनामुक्त ठेवण्याचा संकल्प करुया, असे सांगत टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या संघासाठी चीनी प्रायोजक कंपन्यांना टाळावं, अशी देशवासियांची लोकभावना आहे. त्या लोकभावनेचा आदर होईल आणि तो केला जावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
