Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

Pune – नऊ हजार पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन झाले; पुनर्वसनासाठी शहरातील 454 ठिकाणे निश्‍चित

पुणे : पथारी व्यावसायिकांच्या उपजीविकेचे संरक्षण आणि नियमन अशा दुहेरी हेतूने महापालिकेतर्फे सर्वेक्षण सुरू असून, परवाना दर श्रेणीनुसार आतापर्यंत सुमारे 9 हजारांहून अधिक पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. नोंदणीकृत व प्रमाणपत्रधारक पथारी व्यावसायिकांची परवाना दरश्रेणीनुसार वर्गवारी करण्यात आली असून, पुनर्वसनासाठी शहरातील ४५४ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत.

‘पथारी व्यावसायिक कायद्या’अंतर्गत (स्ट्रीट व्हेंडर्स ऍक्‍ट, २०१४) पादचाऱ्यांना, तसेच स्थानिक रहिवाशांना अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने या जागांची निवड केली गेली आहे. विक्रेता कोणत्या भागात आणि कशाचा व्यवसाय करीत आहे, या निकषांच्या आधारे परवानाशुल्क आकारणी करण्यात येते. महिन्याला दीडशे रुपयांपासून सहा हजार रुपयांपर्यंत शुल्क घेण्यात येते. यातून महापालिकेला दरवर्षी साठ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. शुल्क आकारणीनुसार अ++, अ+, अ, ब, क आणि ई-गटातील कामगार अशा विभागांत पथारी व्यावसायिकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

आतापर्यंत सर्वेक्षणात नोंदणी झालेल्या २१००० पथारी व्यावसायिकांपैकी २० हजारांहून अधिक जणांना महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यातील ९३३१ पथारी व्यावसायिकांचे शहरातील विविध रस्त्यांवर पुनर्वसन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेतर्फे प्रत्येक भागात ‘फेरीवाला झोन’ निर्माण करण्यात येत आहेत. त्याबाबतचे फलकही लावण्यात येणार असून, पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन चांगल्या प्रकारे व्हावे, यासाठी शहरात ४७६ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून, त्यात दर निश्‍चित नसलेल्या व्यावसायिकांचाही समावेश आहे.

याबाबत बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, प्रत्येकाला सन्मानाने व्यवसाय करता यावा, ही महापालिकेची भूमिका आहे. पथारी व्यावसायिकांसाठीचे पुनर्वसन धोरण निश्‍चित करीत अनेक अडथळे दूर केले गेले आहेत. शहरातील प्रत्येक भागात त्याची अंमलबजावणी करीत महापालिका नागरिकांची सोय आणि पथारी व्यावसायिकांना मुख्य प्रवाहाचा भाग बनवीत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading