पुणे महापालिका – गुजरात मधील ठेकेदारासाठी प्रशासनावर माजी मुख्यमंत्र्यांचा दबाव : अरविंद शिंदे यांचा आरोप
पुणे – गुजरात मधील ठेकेदारासाठी माजी मुख्यमंत्री महापालिका प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आराेप अरविंद शिंदे यांनी केला. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने राज्य शासन व महापालिकेच्या नियमांना डावलून व बेकायदेशीर पध्दतीने निविदा प्रक्रिया राबविलेली आहे. ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचा आर्थिक फायदा करणेसाठी महापालिकेची आर्थिक लूट केली असल्याचा आराेप शिंदे यांनी केला.
पुणे, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये एसटीपी बांधणे व ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या ३९२ कोटी रकमेच्या निविदांमध्ये नियमबाह्य तरतुदी केल्या आहे. ठेकेदाराला आगाऊ ४० काेटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहे. तर एसटीपी बांधण्यासाठी जागा ताब्यात नसतानाही त्याची तरतुद केली गेल्याचा आराेप काॅंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे.
समाविष्ट अकरा गावांत ड्रेनेज लाईन टाकण्याची निविदा हा महापालिका वर्तुळात सध्या चर्चेचा विषय झाला आहे. ही निविदा ठराविक ठेकेदारालाच डाेळ्यासमाेर ठेवून त्याच्या अटी शर्थी तयार केल्या आहेत. तसेच या कामाची एकच निविदा न काढता वेगवेगळ्या निविदा काढाव्यात अशी मागणी यापुर्वीच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक आणि आमदार सुनील टिंगरे यांनी केली हाेती. तसेच काॅंग्रेसचे महापािलकेतील गटनेते आबा बागुल यांनीही निविदा प्रक्रीया रद्द करण्याची मागणी केली हाेती. यापाठाेपाठ आता शिंदे यांनी या निविदा प्रक्रीयेतील त्रुटी दाखविल्या आहेत
महापालिका आयुक्त याचा खुलासा करतील का ?
- राज्य शासनाचे आदेश डावलून ठेकेदाराला बिनव्याजी ३९ काेटी का देणार ?
- नियमानुसार निविदाची बयाणा रक्कम ऑनलाईन पद्धतीने घेण्याएैवजी बॅंक गॅरंटी स्वरुपात का घेतली ?
- बयाणा रक्कम ३ काेटी ९२ लाख एैवजी साडे तीन काेटी रुपयेच का स्विकारली ?
- सुरक्षा अनामत रक्कमेत कपात का केली ?
- मांजरी येथे एसटीपीकरीता जागाच ताब्यात नाही, मग त्या कामाचा निविदेत समावेश का ?
- मुळ निविदेमधील अटी व शर्ती प्रिबिड मिटींगनंतर का बदलल्या ?
