Monday, June 15, 2026
Latest NewsSports

कुंजीर तालमीचे वस्ताद स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या चित्रप्रतिमेचे अनावरण

पुणे : महाराष्ट्र केसरीच्या १९६१ सालच्या पहिल्या अधिवेशनात कुंजीर तालमीला पहिजे पदक मिळवून देणारे आणि ६० दशके कुस्तीक्षेत्र गाजविलेले सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावरील कुंजीर तालमीचे वस्ताद स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या चित्रप्रतिमेचे अनावरण तालमीच्या प्रवेशद्वाराजवळ झाले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या प्रतिमेचे अनावरण झाले. 

समस्त कुंजीर तालीम मित्र परिवार आणि मारणे परिवार यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड.अभय छाजेड, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, मास्तर बाळकृष्ण मारणे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, विश्वास मानकर, नगरसेवक राजेश येनपुरे, हेमंत माझिरे, विरेंद्र गट, प्रशांत गांधी, वस्ताद संभाजी आंग्रे, विजय माझिरे, आप्पा शिंदे, बाबासाहेब माझिरे, आप्पासाहेब दिसले, विलास वांजळे, पांडुरंग वांजळे, श्रीरंग चव्हाण, मारुती दिघे, पै.श्रीकृष्णदादा बराटे, रामदास मारणे, शाम मारणे, सरपंच तानाजी मारणे, प्रमोद उमरदंड आदी उपस्थित होते. 

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गुरुवर्य निवृत्ती मारणे यांनी आयुष्यभर लाल मातीची सेवा केली. आपल्या देशाला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे. त्यातील कुस्ती हा क्रीडाप्रकार आपल्याला नम्रता, संस्कार आणि संयम शिकवतो. निवृत्ती मारणे यांच्यासारख्या गुरुंनी केलेले लाल मातीतील संस्कार समाज घडविण्यासाठी उपयुक्त ठरतात. ते स्वत: राष्ट्रीय कुस्तीगीर होते. त्यांनी अनेक मल्ल घडविले आहेत. 
ते पुढे म्हणाले, आता लाल मातीसोबत मॅट आणि प्रशिक्षण केंद्र अशा नव्या गोष्टी आल्या आहेत. त्यातून देखील अनेक मल्ल पुढे येत आहेत. मात्र, मातीतील कुस्ती संपुष्टात येता कामा नये. लाल माती हे आपले दैवत असून जुन्या तालमींचे आणि गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्यासारख्या वस्तादांच्या आठवण व वैभव आपण जपायला हवे. त्याकरीता पुणे मनपा कायमच सहकार्य करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. 
यावेळी अनेक वस्तादांनी त्यांच्याबाबतच्या आठवणी सांगितल्या. घरची प्रतिकुल परिस्थिती असताना देखील त्यातून मार्ग काढत निवृत्ती मारणे हे पुण्यात आले. शंकरराव गायकवाड, वस्ताद पायगुडे, शिवरामपंत दामले या गुरुत्रयींशी त्यांचा संबंध आला. त्यातून ते घडत गेले. त्यांनी नोकरी करीत असताना देखील लाल मातीची व तालमीची शेवटपर्यंत सेवा केली. जीवनाला शिस्त निर्माण करण्याची, वेळेची बंधने पाळण्याची आणि समाजात कसे वावरावे याची शिकवण त्यांनी दिली असल्याच्या अनेक आठवणी यावेळी सांगण्यात आल्या. पै.श्रीकृष्णदादा बराटे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास मारणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading