अमृत महामंडळ कार्यान्वित करा – चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे, दि. 24 : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार असताना अमृत महामंडळ स्थापन करण्यात आले होते. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. हा विषय मंत्रिमंडळ मान्यतेसाठी येणार, तितक्यात राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. अन् महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.आता विद्यमान सरकारने महामंडळाचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महामंडळ कार्यान्वित करावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केली.
क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने ब्राह्मण किर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्यांना एक हात मदतीचा अंतर्गत शिधा वाटप करण्यात आले.यावेळी पाटील बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक आणि पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, दुष्यंत मोहोळ, हर्षदा फरांदे, याज्ञवल्क आश्रमाचे मोहनराव मुंगळे, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे प्रमोदराव शेजवलकर, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक / पुणे केंद्रचे विश्वनाथ भालेराव महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अतुल व्यास, परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे डॉ. अरुण हुपरीकर, ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड.ईशानी जोशी, आम्ही सारे ब्राह्मणचे भालचंद्र कुलकर्णी, ब्राह्मण महासंघाचे मनोज तारे, मदन सिन्नरकर, मयुरेश अरगडे ( विप्र संघ ), हर्षद जोगळेकर, सुशील नगरकर,, सतीश कुलकर्णी यांच्या सह भाजपाच्या पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझीरे, संगीता आदवडे, सौमित्र देशमूख, उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने अमृत महामंडळ स्थापन करुन, त्याला एक हजार कोटी रुपये देऊन ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. त्यानुसार या महामंडळाची स्थापनाही झाली. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. केवळ मंत्रिमंडळ मान्यता बाकी होती. ती मान्यता मिळणार तितक्यात राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर विश्वासघातामुळे भाजपा सरकार गेले, अन् महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. पण विद्यमान सरकारने महामंडळाचा विषय मंत्रिमंडळात आणून ते कार्यान्वित करावे, यासाठी माझा सतत पाठपुरावा सुरू आहे. कोरोनाचा समाजाच्या सर्वच घटकांना फटका बसला. ब्राह्मण समाजातील पौरोहित्य आणि किर्तनकारांना याची झळ बसली. या वर्गाला ही संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून निधी उभारुन ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना एक आधार देता येईल.
