Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

फरहाद फोर्ब्ज यांची द फॅमिली बिझनेस नेटवर्कच्या जागतिक अध्यक्ष पदी फेरनियुक्ती

पुणे, दि. २० – फोर्ब्ज मार्शलचे सह अध्यक्ष फरहाद फोर्ब्ज यांची द फॅमिली बिझनेस नेटवर्क (एफबीएन) च्या जागतिक अध्यक्ष पदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. फरहाद फोर्ब्ज हे या पदी नियुक्त झालेले व युरोपियन नसलेले पहिलेच अध्यक्ष आहेत.

द फॅमिली बिझनेस नेटवर्क (एफबीएन) ही कौटुंबिक व्यवसायांची जागतिक पातळीवरील एक महत्त्वाची संघटना आहे. १९८९ साली स्थापना झालेल्या या संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड मधील लुझान येथे आहे. कौटुंबिक व्यवसायाच्या वृद्धी आणि वाढीसाठी पुढील पिढ्यांना कौटुंबिक व्यवसायाचे महत्त्व समजावून सांगणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, व्यवसायासंदर्भात योग्य मार्गदर्शन करणे, एकमेकांच्या समस्या सोडवीत समाजासमोर कौटुंबिक व्यवसायाचे उदाहरण ठेवणे ही एफबीएनची प्रमुख उद्दिष्टे आहेत. फेडरेशनच्या ६५ देशांत एकूण ३२ सभासद संस्था आहेत. जगभरातील ४ हजार व्यवसायिक कुटुंबातील तब्बल १७ हजार व्यक्ती संघटनेचे सभासद असून यामधील ६ हजार ९०० सभासद हे नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.

सर्वांच्या परिचयाचे असलेले फरहाद फोर्ब्ज हे १९२६ पासून स्टीम इंजिनिअरिंग आणि कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन सोल्यूशन्स क्षेत्रातील आघाडीचे निर्माते असलेल्या फोर्ब्ज मार्शल या कंपनीचे सह अध्यक्ष आहेत. फोर्ब्स  मार्शलची उत्पादने व सेवा या उद्योग क्षेत्रातील ऊर्जाबचत, उत्पादन  प्रक्रियेची गुणवत्ता वाढविणे आणि स्वच्छ, सुरक्षितरीत्या कारखाना चालविण्यास मदत करतात. जगभरातील व्यवसायिक समूहांना प्रोत्साहित करणे हे फोर्ब्ज मार्शलचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे उर्जा व ऑटोमेशन सोल्यूशन्स क्षेत्रातील एक पथदर्शक कंपनी म्हणून फोर्ब्ज मार्शल कार्यरत आहे. ग्राहकांच्या फायद्याचा विचार करीत वितरणाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन, काम करण्यासाठी एक सुयोग्य वातावरण देणारी, उत्पादनाची वितरण व गुणवत्ता सांभाळीत कार्यरत असलेली कंपनी म्हणून फोर्ब्ज मार्शलची ओळख आहे.

एकनिष्ठता, कौटुंबिक भावना, उत्कृष्टता आणि चांगले नागरिकत्व ही कंपनीची पथदर्शक मूल्ये आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) सामाजिक, पर्यावरण व गव्हर्नन्सचे ध्येय पुढे नेण्यासाठी एफबीएन – युएनसीटीएडी (UNCTAD)  प्रतिज्ञेप्रती  फोर्ब्ज मार्शलने स्वाक्षरी करून कटिबद्धता देखील दर्शविली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading