Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी  केली मुस्लिम बांधवांची ईद गोड

पुणे :  रमजान ईदच्या पवित्र महिन्यामध्ये गरजू मुस्लिम कुटुंबांना मदतीचा हात देण्याकरीता गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक मुस्लिम बांधवांकडे ईद साजरी करण्यासाठी घरात रेशन नसल्याचे कळताच गणेशभक्तांनी एकत्र येत त्यांना रेशन आणि भाज्यांचे किट तसेच शेवईचे कीट देऊन मुस्लिम बांधवांची ईद गोड केली आहे. 

सिटी पोस्ट चौकाजवळील महाराष्ट्र तरुण मंडळ आणि युगंधर मित्र मंडळ आनंदनगर यांच्या वतीने ही मदत करण्यात आली. गरजू मुस्लिम बांधव, बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ, वादक तसेच लोककलावंताना देखील यावेळी कीट देऊन मदतीचा हात देण्यात आला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष  महेश सूर्यवंशी,  शुक्रवार पेठ पोलिस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शिरीष मोहिते, पीयुष शाह, महाराष्ट्र तरुण मंडळाचे पृथ्वीराज यळवंडे, अमर गायकवाड, जमीर शेख, श्रीराम सुद्रीक, हनुमंत शिंदे, युगंधर मित्र मंडळाचे मयुर पोटे, निलेश थोरात, अनिकेत पवार उपस्थित होते. 

महेश सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सवात सर्व जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र येतात. भारतीय समाज एकत्र येण्यासाठीच लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली. गणेशोत्सवाचा कार्यकर्ता सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर काम करत असतो. समाजाला कधीही त्याची गरज पडल्यावर तो धावून जातो, हे आजच्या उपक्रमावरुन सिद्ध होते.  गणेशोत्सवाचा उद्देश खºया अर्थाने साध्य करणारा हा उपक्रम आहे. 

आनंद सराफ म्हणाले, मुस्लिम बांधवांना दिलेले हे कीट मदत नसून बाप्पाचा प्रसाद आहे. गणपती मंडळाचे कार्यकर्ते हे जात धर्म विसरुन काम करीत असतात. एकमेकांना भेटल्यावर ते तुझा धर्म कोणता असे विचारत नाहीत तर तुझे मंडळ कोणते हे विचारतात. कार्यकर्त्यांमुळेच समाजामधील एकता सुदृढ होण्यास मदत होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading