सर्व रेशनकार्ड धारकांना सरसकट मे व जून महिन्यात धान्य मिळावे काँग्रेसची मागणी
पुणे – कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शासनाला जनतेच्या हिताकरिता लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले. गोरगरीब जनतेला जगणे कठीण झाले आहे. काँग्रेस पक्ष नेहमी गोरगरीबांच्या हितासाठी त्याच्या पाठिशी उभा राहिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रसंगी केंद्र सरकारने रेशनकार्ड धारकांना सरसकट धान्य दिले होते. त्यामध्ये ज्यांची नोंदणी अन्न सुरक्षा कायद्यात झाली आहे अशांना व ज्यांची नोंदणी झाली नाही अशांनासुध्दा धान्य दिले होते.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोविड सहाय्यता व मदत केंद्र’ समन्वय समितीची बैठक आज काँग्रेस भवन येथे पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने पहिल्या लाटेप्रमाणेच यावेळीही सुध्दा सर्व रेशनकार्ड धारकांना सरसकट मे व जून महिन्याचे धान्य वाटप करावे असा ठराव करण्यात आला.
सदरचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी मांडला व त्यास उपस्थित सर्वांनी एकमताने मंजूरी दिली.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, अविनाश बागवे, प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, रविंद्र धंगेकर, रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाट, यासीन शेख, मंजूर शेख, अमीर शेख, सोनाली मारणे, विशाल मलके, भुषण रानभरे, साहिल केदारी, शिलार रतनगिरी, प्रकाश पवार, हेमंत बागुल आदी उपस्थित होते.
