fbpx
Saturday, April 27, 2024
MAHARASHTRATOP NEWS

ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवेचा राज्यात ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

मुंबई, दि. ३० : राज्यात गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडी  (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज किमान ३०० रुग्ण त्याद्वारे वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३७ हजार ८९१ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्ण जे घरी उपचार घेत आहेत किंवा विलगीकरणात असलेले रुग्ण देखील या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात गेल्यावर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय उपचार आणि सल्ला मिळावा यासाठी १३ एप्रिल २०२० रोजी  ऑनलाईन ई-संजीवनी सेवा सुरू करण्यात आली. सुरूवातीला संकेतस्थळावरून ही सेवा घेण्याची सोय उपलब्ध होती त्यानंतर त्याचे मोबाईल ॲपही विकसित करण्यात आल्याने त्याच्या वापरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ई-संजीवनी ओपीडी सेवा मोफत आहे. या माध्यमातून सामान्य तसेच तज्ज्ञ ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या अॅप्लिकेशनमध्ये करण्यात आली आहे. दिवस ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी या सेवेमार्फत रुग्णांना त्यांच्या आजारावर सल्लामसलत करतात. दररोज सकाळी ९.०० ते दुपारी १.०० आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५.०० यावेळेत ही सेवा घेता येते. रुग्णांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंग आणि चॅटचा वापर करून घरबसल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आजाराबाबत सल्ला घेता येतो.

ई-संजीवनी ओपीडी सेवेमार्फत रुग्णांना सल्ला दिल्यानंतर एसएमएसद्वारे ई-प्रिस्क्रिप्शन रूग्णांना प्राप्त होते. त्याद्वारे रुग्ण जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधे घेऊ शकतात. ई-संजीवनी ओपीडी सेवेचा वापर घेणे करीता रुग्ण esanjeevaniopd.in या संकेत स्थळाला भेट देऊन डॉक्टरांशी सवांद साधू शकतात. तसेच अँन्ड्रॉईड मोबाइल धारक गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन “esanjeevani OPD National Telconsultation Service” या नावाने देण्यात आलेले अॅप्लिकेशन डाउनलोड करून त्याचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading