पीएमपीच्या कोथरूड आगारामधील पावणे तीन वर्षांपासून बंद असलेली सीएनजी बस दुरुस्त करून मार्गावर
पुणे, दि. २९ - पीएमपीएमएलच्या कोथरूड आगारामध्ये इंजिनकाम व स्पेअरपार्ट्स अभावी गेली पावणे तीन वर्षे सीएनजी बस क्रमांक ३८६ बंद अवस्थेत होती. सदर बस करीता लागणारे स्पेअरपार्ट्स व युनिट असेंब्ली उपलब्ध करून या बसची दुरुस्तीची कामे करून व आरटीओ पासिंग करून सदर बस मार्गावर संचलनात आणण्यात पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेंद्र जगताप व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरुरे यांनी मार्गावर संचलनात असणाऱ्या बसेसची संख्या वाढवण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. सीएनजी बसेस ह्या पर्यावरणपूरक असल्याने बंद अवस्थेत असणाऱ्या सीएनजी बसेस दुरुस्त करून मार्गावर आणण्याबाबत मा.डॉ.राजेंद्र जगताप व डॉ.चेतना केरुरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. यामुळे मार्गावरील बसेसची संख्या वाढून प्रदूषणाला आळा बसणार आहे. त्या अनुषंगाने या सूचनांची अंमलबजावणी करत कोथरूड आगारातील सीएनजी बस क्र.३८६ या बसची दुरुस्तीची कामे व आरटीओ पासिंगची प्रक्रिया पूर्ण करून सदर बस दि. २९ एप्रिल २०२१ रोजी मार्गावर आणण्यात आली आहे. पीएमपीएमएलचे चिफ कोऑर्डीनेटर सुनिल बुरसे,मुख्य अभियंता कैलास गावडे व अनंत वाघमारे,भांडार अधिकारी राजेश रुपनवर यांनी सदर बस करीता लागणारे स्पेअरपार्ट्स व युनिट असेंब्ली उपलब्ध करून दिल्यामुळे सदरची बंद अवस्थेत असणारी सीएनजी बस मार्गावर आणण्यात यश आले आहे. कोथरूड आगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम व आगार अभियंता विलास मते यांच्या मार्गदर्शनाखाली सुपरवायझर राजेंद्र पायगुडे यांनी वर्कशॉपमधील सेवकांकडून सदर बसचे दुरुस्तीचे काम करून घेतले.
