Saturday, June 13, 2026
PUNE

वाचनसंस्कृती जीवनाचा अविभाज्य भाग असायला हवी – प्रा. डॉ. संजय चोरडिया

पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पुस्तक दिवस व कॉपीराईट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करत संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी (स्टाफ) समकालीन विषयांवरील पुस्तकांचे सामूहिक वाचन केले. अनोख्या पद्धतीने पुस्तक दिवस साजरा करत येथील कर्मचाऱ्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली. वाचनसंस्कृती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असायला हवा, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी यावेळी नमूद केले.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आयुष्यात आपल्याला अद्ययावत ठेवण्यासाठी व्यावसायिक, तसेच अवांतर पुस्तक वाचन किती महत्वाचे आहे, याविषयी त्यांनी सांगितले. वाङ्मयचौर्य, आशयाधिकार, परवाना आदी गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या. संस्थेशी संलग्नित विविध शाळा, कॉलेज व इन्स्टिट्यूटमधील ५० पेक्षा अधिक स्टाफ या सामूहिक पुस्तक वाचनात सहभागी झाला. प्रा. संदीप जैन यांनी कार्यक्रमाचे समन्वयन करत सोशल डिस्टंसिंग काटेकोरपणे पाळले जाईल, याची खबरदारी घेतली.

पुस्तकांची बॅटरी कधीच ‘डिस्चार्ज’ होत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान वगॅजेट्सच्या वापरातून मन आणि शरीराला आराम, तसेच ऊर्जा देण्यासाठी देत रोज पुस्तक वाचन करावे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. वाचणे हे पेरणे असते, तर लिहिणे हे उगवणे असते. उगवण्याची चिंता करत बसण्यापेक्षा आपण पेरण्यावर लक्ष द्यावे. एक दिवस तेच आपल्या शेतात उगवलेले लोक पेरण्यासाठी घेऊन जातील, या सूत्राचाही उल्लेखही डॉ. संजय चोरडिया यांनी आपल्या भाषणात केला.

बौद्धिक संपत्ती सल्लागार आणि एएम लीगल असोसिएट्सचे संस्थापक ऍड. आनंद माहूरकर यांनी भारतातील कॉपीराईट आणि इनोव्हेशनचे महत्व यावर विद्यार्थी व स्टाफला मार्गदर्शन केले. बौद्धिक संपत्ती ही शाश्वत आणि मौल्यवान असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘सूर्यदत्ता’मध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रोज एक तास वाचनाचा तास सुरु करण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालये सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांसाठी एक तास वाचन अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात येणार असून, वाचनासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

प्रा. डॉ. संजय चोरडिया पुढे म्हणाले, “सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नियमितपणे स्टाफ, विद्यार्थी आणि संस्थेशी संबंधित लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असते. गेल्या दोन दशकांपासून सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ‘सूर्यदत्ता’ कार्यरत आहे. दर्जा, मूल्ये आणि कौशल्यांचा आधार येथील शिक्षणाला आहे. देशभरात शिक्षण क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेत राबविण्यास मदत होते. तसेच आमच्या येथील अनेक चांगले आणि सर्वांगीण विकासाचे उपक्रम राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे.” 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading