दिल्ली – सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली- देशात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. दिल्लीत आज अशीच घटना घडली ज्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ही घटना घडली.
दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून दिल्लीमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी दिल्लीतील GTB रुग्णालयात एक आणिबाणीचा प्रसंग निर्माण होऊन ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे 500 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. पण या ठिकाणी वेळेत ऑक्सिजनचा टॅन्कर पोहोचला आणि या सर्व रुग्णाचा जीव वाचला. ही घटना ताजी असतानाच आज सर गंगाराम रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे.
सर गंगाराम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजनचा पुरवठा अजून केवळ दोनच तास चालेल. व्हेन्टिलेटर आणि बीआयपीएपी मशिन प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.